Advertisement

EXCLUSIVE : प्रियाला पुन्हा लागले रंगभूमीचे वेध

रंगभूमीवर घडलेला एखादा कलाकार कितीही मोठा झाला तरी रंगभूमीला विसरत नाही. त्यामुळंच काही कलाकार मोठे झाले तरी कारकिर्दीच्या एखाद्या वळणावर पुन्हा रंगभूमीकडं वळतात. छोट्या पडद्यावर लोकप्रिय झालेल्या प्रिया मराठेलाही पुन्हा एकदा रंगभूमीचे वेध लागले आहेत.

EXCLUSIVE : प्रियाला पुन्हा लागले रंगभूमीचे वेध
SHARES

रंगभूमीवर घडलेला एखादा कलाकार कितीही मोठा झाला तरी रंगभूमीला विसरत नाही. त्यामुळंच काही कलाकार मोठे झाले तरी कारकिर्दीच्या एखाद्या वळणावर पुन्हा रंगभूमीकडं वळतात. छोट्या पडद्यावर लोकप्रिय झालेल्या प्रिया मराठेलाही पुन्हा एकदा रंगभूमीचे वेध लागले आहेत.

प्रेक्षकांमध्ये पॅाप्युलर

प्रिया मराठे हे नाव मराठी रंगभूमीवरील रसिकांसोबतच छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांमध्ये चांगलंच पॅाप्युलर आहे. काही जण तिला नावानं ओळखत नसले तरी तिनं साकारलेल्या व्यक्तिरेखांवरून नक्कीच ओळखत असतील. २००५ मध्ये 'या सुखांनो या' असं म्हणत मराठी मालिकाविश्वात दाखल झालेल्या प्रियानं अल्पावधीतच अपार लोकप्रियता मिळवत थेट हिंदी मालिकेत प्रवेश केला. 'कसम से'मध्ये तिनं साकारलेली विद्या बाली चांगलीच गाजली होती. त्यानंतर 'चार दिवस सासूचे', 'पवित्र रिश्ता', 'उतरन', 'बडे अच्छे लगते है' या गाजलेल्या हिंदी मालिकांमध्येही अभिनय केला.

एका नाटकाची आॅफर

'तू तिथं मी'मध्ये तिनं साकारलेली प्रिया मोहिते हे नकारात्मक व्यक्तिमत्त्वही लक्षवेधी ठरलं होतं. यासोबतच 'कॅामेडी सर्कस'मध्ये प्रियाचे हास्यरंगही प्रेक्षकांनी पाहिले आहेत. 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेत गोदावरीच्या रूपात तिचं ऐतिहासिक रूपही पहायला मिळालं आहे. सध्या 'साथ दे तू मला' या मालिकेत काम करणाऱ्या प्रियाला एका नाटकाची आॅफर आली आहे. या नाटकाबाबत फारशी काही माहिती उपलब्ध होऊ शकली नसली तरी प्रियाकडं संहिता आल्याचं सूत्रांकडून समजतं. सध्या प्रिया एकीकडं 'साथ दे तू मला' मध्ये काम करत आहे, तर दुसरीकडं नाटकाच्या संहितेचं वाचनही करत आहे. बऱ्याच कालावधीनंतर एक नाटक करायला मिळणार असल्यानं प्रिया फार उत्साहित आहे. याबाबतची आणखी माहिती लवकरच समजेल.
हेही वाचा -

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात युती आघाडीवर

'अशी' आहे मतमोजणी केंद्राबाहेर सुरक्षासंबंधित विषय
Advertisement