Advertisement

संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सव उत्साहात संपन्न

या महोत्सवात यंदा नाट्यविभागातून अंतिम फेरीसाठी 'गलतीसे मिस्टेक', 'तिला काही सांगायचे आहे', 'दादा एक गुड न्यूज आहे', 'सोयरे सकळ', 'गुमनाम है कोई' या पाच नाटकांची निवड झाली होती.

संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सव उत्साहात संपन्न
SHARES

संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात येणारा तीन दिवसीय संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सव नुकताच उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात आघाडीच्या पाच नाटकांचे प्रयोग सादर करण्यात आले.


यशवंत नाट्यगृहामध्ये संपन्न

या महोत्सवाचं उद्घाटन दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांच्या पत्नी व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मृदुला भाटकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला प्रमुख शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी संस्कृती कलादर्पणचे अध्यक्ष व संस्थापक चंद्रशेखर सांडवे, अर्चना नेवरेकर फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर यांच्यासह विजय गोखले, मिलिंद गवळी, गुरुदत्त लाड, कांचन अधिकारी, प्राजक्ता कुलकर्णी, स्मिता जयकर, सविता मालपेकर आदि मान्यवर उपस्थित होते. माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहामध्ये हा महोत्सव पार पडला.


नाट्यमहोत्सवाचं १९ वं वर्ष

यंदा नाट्यमहोत्सवाचं १९ वं वर्ष असून, महोत्सवाला नाट्यरसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. समारोपाच्या भाषणात बोलताना सांडवे म्हणाले की, मराठी नाट्यसृष्टी जिवंत ठेवण्यासाठी संस्कृती कलादर्पण नेहमी प्रयत्नशील राहिली आहे. आम्ही ऑड डेला नाटयमहोत्सव हाऊसफुल्ल करू शकतो, तर निर्माते का करू शकणार नाहीत? असा सवाल उपस्थित करत नाट्यसृष्टीला सुगीचे दिवस यावेत यासाठी त्यांनी नटेश्वरा चरणी प्रार्थना केली. 


नाईलाजास्तव ठिकाण बदलणार

२० वा म्हणजेच पुढल्या वर्षी नाट्य आणि चित्रपट महोत्सवाचं आयोजन यशवंत नाट्य मंदिरात करण्यात येणार नसून रविंद्र नाट्य मंदिरात करण्यात येईल असंही सांडवे यांनी सांगितलं. यशवंत नाट्य मंदिर इतर नाटकांसाठी पाच हजार भाडं आकारतं, पण आमच्यासाठी तेच भाडं १७ हजारांच्या पुढे जातं याचं खंतही सांडवे यांनी व्यक्त केली. त्यामुळं नाईलाजास्तव ठिकाण बदवालं लागत असून, रसिकांनी याची दखल घ्यावी असं आवाहनही सांडवे यांनी केलं. रसिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्द्ल त्यांचे आभार मानत सर्वांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. 


अंतिम फेरीत पाच नाटकं

या महोत्सवात यंदा नाट्यविभागातून अंतिम फेरीसाठी 'गलतीसे मिस्टेक', 'तिला काही सांगायचे आहे', 'दादा एक गुड न्यूज आहे', 'सोयरे सकळ', 'गुमनाम है कोई' या पाच नाटकांची निवड झाली होती. नाट्य महोत्सवातील पहिलं नाट्य पुष्प 'गलतीसे मिस्टेक' या नाटकानं गुंफलं, तर महोत्सवाची सांगता 'गुमनाम है कोई' या नाटकानं करण्यात आली.



हेही वाचा-

नवं कोरं एकवचनी नाटक 'मी माझे मला'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा