Advertisement

EXCLUSIVE : तावडे पिता-पुत्राचा अजब योगायोग!

आजवर नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या सुनील तावडेंचा शुभंकर मराठी रंगभूमीवर माइलस्टोन ठरलेल्या 'नटसम्राट' या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. आप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेतील मोहन जोशी आणि शुभंकरने साकारलेला राजा या नाटकात पहायला मिळत असून सध्या या दोघांची जोरदार चर्चा सुरू आहे.

EXCLUSIVE : तावडे पिता-पुत्राचा अजब योगायोग!
SHARES

योगायोग हे ठरवून होत नसतात, तर अनपेक्षितपणे जुळतात त्यांनाच योगायोग म्हणतात. असे बरेच योगायोग सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी जुळून आले असतील. मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी अभिनेता अशी प्रतिमा असणाऱ्या सुनील तावडे आणि त्यांचा मुलगा शुभंकर यांच्याबाबतीतही एक असा योगायोग जुळून आला आहे जो खऱ्या अर्थाने आश्चर्यचकित करणारा आहे. याला खरं तर योगायोगही किंवा इतिहासाची पुनरावृत्तीही म्हणता येईल.

आजवर नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या सुनील तावडेंचा शुभंकर मराठी रंगभूमीवर माइलस्टोन ठरलेल्या 'नटसम्राट' या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. आप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेतील मोहन जोशी आणि शुभंकरने साकारलेला राजा या नाटकात पहायला मिळत असून सध्या या दोघांची जोरदार चर्चा सुरू आहे. आता या सर्वांचा शुभंकरच्या वडिलांशी काय संबंध? असा प्रश्न मनात येणं साहाजिक आहे. याचं उत्तर 'मुंबई लाइव्ह'शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना स्वत:  शुभंकरनेच दिलं आहे.


यापूर्वी काय केलं?

रुईया कॅालेजमधून बी.कॅामपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर साहित्य संघमधील ड्रामा स्कूलमध्ये वर्षभर अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर 'फ्रेशर्स' या मालिकेद्वारे मालिकाविश्वात एंट्री झाली. या मालिकेतील संग्राम पाटील नावाची व्यक्तिरेखा खूप गाजली. लेखक-अभिनेता-दिग्दर्शक ऋषिकेश जोशीच्या 'गर्व निर्वाण' या नाटकातील नृसिंह तांडव रसिकांना खूप भावलं. 'डबलसीट' या चित्रपटात अंकुश चौधरीच्या धाकट्या भावाची भूमिका साकारली. 


काय आहे योगायोग?

मोहन जोशींच्या 'नटसम्राट'मध्ये मी राजा नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. हा राजा एके काळी नटसम्राट असलेल्या आप्पा बेलवलकरांना त्यांच्या अखेरच्या वाईट दिवसांमध्ये पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळतो. योगायोग असा आहे की, माझ्या वडिलांनी सतिश दुभाषी आणि चंद्रकांत गोखले यांनी साकारलेल्या बेलवलकरांच्या 'नटसम्राट'मध्ये हीच व्यक्तिरेखा साकारली होती. याहीपेक्षा पुढे जाऊन सांगायचं तर व्यावसायीक रंगभूमीवरील त्यांचीसुद्धा ही पहिलीच भूमिका होती आणि माझीही.


असा मिळाला राजा

ऋषिकेशसोबत 'गर्व निर्वाण' या नाटकात नृसिंह तांडव केलं होतं, तरी त्याला माझ्या अभिनय कौशल्याबाबत फारसं ठाऊक नव्हतं. मी चांगलं काम करत असल्याचं त्याला कोणाकडून तरी समजलं आणि त्याने मला 'नटसम्राट' या नाटकात काम करायला इच्छुक आहेस का? असं विचारलं होतं. मला रोल कोणता ते ठाऊक नव्हता, तरीही 'नटसम्राट'सारखं मोठं नाटक असल्याने मी होकार दिला. या नाटकात मी राजाचीच भूमिका साकारत असल्याचं मला नंतर जेव्हा समजलं तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला आणि आनंदही झाला.


अख्खं नाटक तोंडपाठ!

'नटसम्राट' हे नाटक माझ्या अंगात भिनलं आहे. मी हे नाटक बघण्यापेक्षा बालपणापासून ऐकत आलो आहे. वडिलांच्या तोंडून कायम या नाटकाबद्दल ऐकलं आहे. यातील सर्व सोलोलुकीज माझ्या तोंडपाठ आहेत. कोणती व्यक्तिरेखा कधी एंट्री करते, काय बोलते हे सर्व काही मला ठाऊक आहे. त्यामुळे मी आत जेव्हा विंगेत असतो तेव्हा इतरांचेही डायलॅाग बोलत असतो. यातील 'हे स्वर्गस्थ शक्तींनो...', 'टू बी आॅर नॅाट टू बी...' आणि 'घर देता का...' हे संवाद मनावर कोरले गेले आहेत.


वडिलांना कल्पना नव्हती

'नटसम्राट' या नाटकाची आॅफर मला आली आणि त्यावर मी काम करतो हे सुरुवातीला वडिलांना ठाऊक नव्हतं. खरं तर आधी मला त्यांना काही सांगायचं नव्हतं. पण मला कोणतं तरी मोठं नाटक मिळाल्याचं त्यांना बाहेरून समजलं. 'नटसम्राट'मधील राजाची भूमिका साकारत असल्याचं त्यांना समजलं तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. या नाटकातील ही भूमिका भाग्यवान अभिनेत्याला मिळते असं ते म्हणाले. त्यांना राजा या व्यक्तिरेखेचं खूप कौतुक असून ती साकारणाऱ्या कलाकारांचंही आहे.


ताजेपणा हवा होता

मी साकारलेली राजाची व्यक्तिरेखा ही पूर्वीच्या कलाकारांची कॅापी नसावी असं मला वाटत असल्याने मी नाटक पाहिलं नाही. युट्यूबवर डाॅ. श्रीराम लागूंच्या काही सोलोलुकीज पाहिल्या. त्या पलीकडे राजा ही व्यक्तिरेखा इतर कलाकारांनी कशी साकारली याचा विचार न करता आपल्या परीने राजा साकारण्याचा प्रयत्न करत आहे. करियरच्या सुरुवातीच्या काळात मोहन जोशींसारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला थोडा नव्हर्स होतो, पण स्टेजवर गेल्यावर नर्व्हसनेस परागंदा होऊन रसिकांना अपेक्षित असलेला राजा समोर येतो.


सरकारच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी

या नाटकातील आप्पा बेलवलकरांची पत्नी कावेरी उर्फ सरकारची भूमिका रोहिणी हट्टंगडी साकारत आहेत. याशिवाय सुशील इनामदार, भक्ती देसाई, श्वेता मेहेंदळे, अभिजीत झुंझारराव, मिलिंद अधिकारी, आशीर्वाद मराठे, सायली काजरोळकर आणि राम सईदपुरे यांच्याही या नाटकात भूमिका आहेत. एकदंत क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या नाटकाची प्रस्तुती करण्याची जबाबदारी झी मराठीने स्वीकारलेली आहे.



हेही वाचा - 

मोहन जोशी बनले ‘नटसम्राट’ आप्पा बेलवलकर

'टिळक आणि आगरकर'सोबत रंगभूमीवर अवतरणार 'वाजे पाऊल आपुले'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा