• सुबोध-श्रुतीच्या मनातील ‘शुभ लग्न सावधान’चा ट्रेलर लाँच
  • सुबोध-श्रुतीच्या मनातील ‘शुभ लग्न सावधान’चा ट्रेलर लाँच
SHARE

आजवर लग्नावर आधारित बरेच सिनेमे आले असले तरी प्रत्येकाने आपलं वेगळेपण जपलं आहे. सध्या फॅड आहे ते डेस्टिनेशन वेडींगचं. त्यावरच आधारित असलेल्या ‘शुभ लग्न सावधान’ या मराठी सिनेमाचा ट्रेलर सुबोध भावे आणि श्रुती मराठे या मुख्य कलाकारांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आला.


लग्न म्हटलं की लगीनघाई ही आलीच! आपल्याकडे अगदी एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या लग्नसोहळ्यावर आधारित ‘शुभ लग्न सावधान’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित १२ ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर मुंबईतील दादरमधील नक्षत्र माॅलमधील आयनाॅक्स सिनेमागृहात लाँच करण्यात आला. या सोहळ्याला सुबोध-श्रुतीसह ‘शुभ लग्न सावधान’मधील कलाकार-तंत्रज्ञांची टिमही उपस्थित होती.


लग्नसंस्थेवर आधारित असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले चेहरे पाहायला मिळतात. सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्येही लग्न आणि लग्नाच्या अनुषंगाने तयार झालेल्या वातावरणावर फोकस करतो.लग्नाबद्दलची विविध लोकांची मतमतांतरं यात पाहायला मिळतात. ट्रेलरच्या सुरुवातीलाच एक ख्रिश्चनधर्मीय लग्नदेखील यात आहे. लग्नापासून दूर पळत असलेल्या नायकाची प्रेमाबद्दलची परिभाषादेखील यात आहे.


प्रदर्शन नवरात्रीत 

डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख, रेवती लिमये, सतीश सलागरे, प्राची नील अशी कलाकारांची मोठी फळी या सिनेमात आहे. विवाहोत्सुकांना आपलासा करणारा हा सिनेमा, कार्यकारी निर्माते अभय शेवडे यांच्या संकल्पनेतून आकारास आला आहे. नवरात्रीच्या धामधुमीत हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या