Advertisement

एसटीचे २० संपकरी कामगार रुग्णालयात; बदलत्या हवामानाचा फटका

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरातील आझाद मैदानात एसटीचे कर्मचारी आंदोलन करत आहेत.

एसटीचे २० संपकरी कामगार रुग्णालयात; बदलत्या हवामानाचा फटका
SHARES

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरातील आझाद मैदानात एसटीचे कर्मचारी आंदोलन करत आहेत. मात्र आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीत बिघाड होत असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक एसटी संपकरी कर्मचाऱ्यांना मुंबईतील लहरी हवामानाचा फटका बसला आहे. आतापर्यंत २० कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. एसटीचे महामंडळात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरातून काही एसटी कर्मचारी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. त्यापैकी २० कर्मचाऱ्यांना १४ ते २२ नोव्हेंबर दरम्यान विविध आरोग्याच्या तक्रारींमुळे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यामध्ये महिला, पुरुष आणि पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. फिट येणे, छातीत दुखणे, ताप येणे, श्वास अडकणे, चक्कर येणे या लक्षणांमुळे या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती एसटी कर्मचाऱ्यांनी दिली. या कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे.

रात्री पडणाऱ्या पावसामुळं कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे. अशातच सरकारकडून मागण्या मान्य होत नाही उलट कारवाईची संख्या वाढत असल्यानं कुटुंबीयांची चिंता ही कर्मचाऱ्यांना सतावत आहे. मागील ३-४ दिवसांपासून रात्रीच्या वेळी पावसानं हजेरी लावल्यानं तसंच दिवसा कडक उन्हामुळं आंदोलकांना त्रास होत आहे.

हवामानातील बदलामुळं संप करणारे कर्मचारी आजारी पडत आहेत. गेट वे ऑफ इंडिया जवळ तैनात असलेली रुग्णवाहिका १४ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात आहे. यापूर्वी अन्य रुग्णवाहिका मैदानात होती. या संपकऱ्यांना रुग्णवाहिकेची सेवा मोफत देण्यात येते. मैदानातील एका कोपऱ्यात फिरत्या स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. दुसऱ्या कोपऱ्यात पाण्याचा टँकर उभा करण्यात आलेला आहे. दुपारी कडक ऊन असल्याने सावलीसाठी झाडाझुडपांच्या, पोलिस व्हॅन आणि रुग्णवाहिकेच्या सावलीत संपकरी बसलेले असतात, अशी माहिती एसटी संपकऱ्यांनी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा