Advertisement

मुंबईत सेव्हन स्टार क्रूझचं आगमन, परदेशी पाहुण्यांचा ३ दिवस मुक्काम


मुंबईत सेव्हन स्टार क्रूझचं आगमन, परदेशी पाहुण्यांचा ३ दिवस मुक्काम
SHARES

जलवाहतुकीला आणि पर्यायानं मुंबईतील पर्यटनाला चालना देत परदेशी पर्यटकांना मुंबईकडं आकर्षित करण्याच्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. कारण मुंबईत पहिल्यांदाच परदेशी सेव्हन स्टार क्रूझ दाखल झाली आहे. या क्रूझमध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टमधून नव्या ९०० परदेशी प्रवाशांनी प्रवेश घेतला आहे.


३ दिवसांचं मुंबई दर्शन पूर्ण

क्रूझमधील सर्व प्रवासी ३ दिवसांचं मुंबई दर्शन पूर्ण करत रविवारी, ९ सप्टेंबरला रात्री उशीरा गोव्याच्या दिशेनं कुच करणार असल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. यामुळं जलवाहतूक, मुंबईचं पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी आशाही भाटीया यांनी व्यक्त केली आहे.

परदेशी क्रूझला आकर्षित करण्यासाठी पोर्ट ट्रस्टनं गेल्या काही दिवसांत तिकीट दरांत आकर्षक सवलत देण्यापासून ते ई-व्हिसापर्यंत, अशी ठोस पाऊलं उचलली आहेत. त्यामुळं परदेशी पर्यटक आणि परदेशी क्रूझ मुंबईकडे आकर्षित होताना दिसत आहेत.



९०० पर्यटकांचा प्रवास

७ सप्टेंबरला पोर्ट ट्रस्टवर Viking Orion ही स्टार क्रूझ मुंबईत दाखल झाली आहे. या क्रूझमध्ये ९०० परदेशी पर्यटक होते, त्यातील काही पर्यटकांचा मुंबईपर्यंतचा प्रवास संपला आहे. तर नव्यानं ९०० प्रवाशांनी मुंबई पोर्ट ट्रस्टमधून स्टार क्रूझनं प्रवास सुरू केला आहे. या ९०० नव्या प्रवाशांपैकी बहुतांश प्रवासी परदेशी असून ते विमानानं मुंबईत दाखल झाले होती. तरीही त्यांनी मुंबईतून क्रूझने प्रवास करण्यास पसंती दर्शवली आहे हे विशेष. मुंबईत पहिल्यांदा परदेशी स्टार क्रूझ येणं आणि ९०० प्रवाशांनी प्रवास सुरू करणं ही मुंबईच्या पर्यटनाला, जलवाहतुकीला चालना देणारी बाब असल्याचं म्हटलं जात आहे.



पारंपरिक कार्यक्रमांची मेजवानी

सेव्हन स्टार क्रूझमधील प्रवाशी शुक्रवारपासून मुंबईत असून मुंबई दर्शन आणि मुंबई तसंच देशातील विविध राज्यांच्या सांस्कृतिक परंपरेची माहिती विविध कार्यक्रमांतून या परदेशी पर्यटकांपर्यंत पोहोचवली जात आहे. अगदी कोळीनृत्यापासून गरबा, भांगडा, कथक, लावणी घुमर अशा नृत्याचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचा परदेशी पर्यटक आनंद घेत असल्याचं भाटीया यांनी सांगितलं.


साड्यांची शाॅपिंग

अथेन्सवरून निघालेली ही क्रूझ मस्कतवरून मुंबईत दाखल झाली असून तीन दिवस मुंबईत मुक्काम करून रविवारी रात्री उशीरा ही क्रुझ गोव्याच्या दिशेनं प्रवास सुरू करणार आहे. तर या क्रूझची जगभ्रमंती साऊथ इस्ट एशियाच्या दिशेनं होणार आहे. दरम्यान क्रूझमधील परदेशी पर्यटक मुंबईत धमाल मजा मस्ती करत असून या परदेशी पर्यटकांकडून चक्क साड्यांचीही शाॅपिंग सुरू असल्याचं समजतं आहे.



जलवाहतुकीला चालना

परदेशी क्रूझ मुंबईत अधिकाधिक संख्येनं याव्यात आणि मुंबईच्या अर्थव्यवस्थेला तसंच पर्यटनाला चालना मिळावी यासाठी भविष्यातही अनेक उपक्रम राबवत नवनव्या योजना आणल्या जाणार असल्याचं भाटीया यांनी सांगितलं आहे. दरम्यान मे अखेरीपासून सुरू झालेली जलवाहतूक आणि जलपर्यटन सप्टेंबरमध्ये सुरू होतं. त्याप्रमाणे जलवाहतूक आणि जलपर्यटनाला आता सुरूवात झाली असून एप्रिल-मे पर्यंत पर्यटकांना जलवाहतुकीचा, जलपर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे वर्षाला, मौसमात ४०० ते ५०० क्रूझ मुंबईत याव्यात असं उद्दीष्ट मुंबई पोर्ट ट्र्स्ट आहे. त्यादृष्टीनं त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत.



हेही वाचा-

माऊंट मेरीच्या जत्रेसाठी बेस्टच्या जादा बसगाड्या

एसटीच्या ताफ्यात लवकरच 700 नव्या गाड्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा