Advertisement

धीम्या १५ डब्यांसाठी ७० कोटींच्या कामांना मंजुरी


धीम्या १५ डब्यांसाठी ७० कोटींच्या कामांना मंजुरी
SHARES

वाढती प्रवासी संख्या लक्षात घेत पश्चिम रेल्वेने अंधेरी ते विरारपर्यंत धीम्या मार्गावर १५ डब्यांची लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी जवळपास ७० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये प्लॅटफॉर्मची लांबी, सिग्नल यंत्रणेत बदल, वळणाकडील रुळांना अन्यत्र नेणे आदी कामांचा समावेश आहे. या कामांसाठी सुमारे दीड ते दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.


प्लॅटफॉर्मची लांबी, सिग्नल यंत्रणेत बदल

पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते विरार आणि त्यापुढील मार्गांवर उपनगरीय प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याअनुषंगाने पश्चिम रेल्वेने अंधेरी ते विरारपर्यंत १५ डब्यांच्या लोकलचा विस्तार धीम्या मार्गांवरही करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, हा निर्णय अंमलात आणताना त्यातील अनेक तांत्रिक समस्या, अडचणींचा आढावा घेऊन त्याप्रमाणे नियोजन केलं आहे.


लवकरच या कामांना गती 

सर्वाधिक प्राधान्य पायाभूत सुविधा उभारण्यावर देण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकल्पात १५ डब्यांच्या लोकल धीम्या मार्गावर चालवण्यासाठी अतिरिक्त डब्यांचीही आवश्यकता भासणार असून त्यासाठी स्वतंत्र तरतूद केली जाणार आहे. त्याव्यक्तिरिक्त पायाभूत सुविधा पुरवण्याच्या अनुषंगाने योजना आखण्यात आली आहे. सध्या अंधेरी ते विरारपर्यंत धीम्या मार्गांवर लोकल चालवण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणं हे मोठं आव्हान आहे. या सर्व तांत्रिक गोष्टींसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच ही कामं सुरू होण्याची अपेक्षा आहे.


७० कोटींचा खर्च अपेक्षित

जवळपास ७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, अतिरिक्त डब्यांच्या खरेदीसाठी वेगळा खर्च होणार आहे. यामध्ये प्लॅटफॉर्मची लांबी वाढवून उपयोग होणार असून त्यास जोडून सिग्नल यंत्रणेत आवश्यक बदल करण्याचाही भाग महत्त्वाचा ठरणार आहे.

प्लॅटफॉर्मच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत असणाऱ्या सिग्नल यंत्रणेत प्लॅटफॉर्मच्या लांबीनुरुप बदल करावे लागतील. सिग्नल यंत्रणेत बदल करतानाच वळणाच्या ठिकाणी असणाऱ्या रुळांचीही जागा बदलावी लागणार आहे. ही कामं पूर्ण झाली की धीम्या मार्गावरही १५ डब्यांची लोकल धावेल, असा विश्वास पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा