Advertisement

'दख्खनची राणी' होणार डबल डेकर?


'दख्खनची राणी' होणार डबल डेकर?
SHARES

वय वर्ष ८८. पण आजही तोच जोश. एखाद्या राणीवानी तिचा थाटमाट. ऐटीत धावणारी डेक्कन क्वीन. मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात डेक्कन क्वीनसाठी वेगळे स्थान आहे. याच डेक्कन क्वीननं आज ८८ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. पण आजही या क्वीनचा डौल कायम आहे. कोळशाच्या जागी वीजेवर धावणारं इंजिन जोडण्यात आलं. प्रवासी संख्येबरोबरच डब्यांची संख्याही वाढत गेली. रंगसंगती बदलली. पण दिवसेंदिवस ही क्वीन आणखीनच तरूण होत गेली. तिचा ८८ वर्षांचा प्रवास हा काळानुसार बदलत गेला.

१ जून १९३൦ पासून डेक्कन क्वीन मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांच्या सेवेत आहे. पण घाटातून अपडाऊन करत या क्वीननं मुंबई आणि पुण्याला जोडलं आहे. चंदेरी-निळ्या रंगसंगतीच्या सात डब्यांनी सुरु झालेला प्रवास आजही सुरू आहे. भारतातील पहिली डिलक्स ट्रेन असलेल्या या गाडीचा रंग आता पांढरा आणि निळा झालाय. डब्यांची संख्या ७ वरून १७ करण्यात आली आहे. पण वाढते प्रवासी पाहता डेक्कन क्वीनवरील भारही वाढतोय. त्यामुळे डेक्कन क्वीनचे डबे आणि फेऱ्या वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसे प्रयत्नही प्रवासी संघटनेतर्फे सुरू करण्यात आले आहेत.

पुण्याला ‘क्वीन ऑफ डेक्कन’ म्हणून ओळखले जाई. त्यावरुनच या गाडीला ‘डेक्कन क्वीन’ हे नाव दिले गेले. पुणे-मुंबई प्रवाशांसाठी दख्खनची राणी खूप खास आहे. दख्खनच्या राणीमुळे पुण्यातल्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर झाला. पण दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढतेय. पुण्याहून सकाळी पावणे सातला ट्रेन सुटते. ही ट्रेन मुंबईत १०.३൦ ला पोहोचते. त्या ट्रेनला खूप गर्दी असते. विद्यार्थी, स्त्रिया सर्वांनाच उभं राहून प्रवास करावा लागतो. त्यामुळे आम्ही डेक्कन क्वीन डबल डेकर करण्याची मागणी करत आहोत. शिवाय या ट्रेनच्या फेऱ्या वाढाव्यात ही मागणीही आम्ही रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. यावर विचार सुरू आहे. जर डेक्कन क्वीन डबल डेकर झाली आणि ट्रेनच्या फेऱ्या वाढल्या तर चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुखकर होईल. 

- वंदना गायकवाड, डिविजनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी

१९८൦ दरम्यान गाडी १२ डब्यांची झाली. पण २००४च्या सुमारास गाडी १७ डब्यांची झाली. प्रवासाचा वेळ २ तास ४५ मिनिटांवरून तीन तास २५ मिनिटांपर्यंत वाढला. १९८൦च्या आसपास जास्त प्रवाशांसाठी डबल डेकर डबे लावले गेले. पण कालांतरानं ते काढून टाकण्यात आले. पण बदलत्या काळानुसार ट्रेनची रचना बदलत गेली. कदाचित येत्या काळात तुम्हाला डेक्कन क्वीनमध्ये आणखी काही बदल झालेले दिसतील. पण बदलणार नाही ते प्रवाशांचं या डेक्कन क्वीनवर असणारं प्रेम. काळाच्या ओघात राणीनं अनेक बदल पाहिले. भविष्यातही अनेक बदल होतील. पण तिचा डौल मात्र कायम राहील यात शंका नाही.

डेक्कन क्वीनच्या ८८व्या वाढदिवशी आठवत आहेत त्या कवी वसंत बापट यांच्या काव्यपंक्ती.

दख्खन राणीच्या पोटात कुशीत

शेकडो पिले ही चालली खुशीत

मनाने खुरटी दिसाया मोठाली

विसाव्या तिसाव्या वर्षीही आंधळी

बाहेर असू दे ऊन वा चांदणे

संततधार वा धुक्याचे वेढणे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा