मोनोरेल बिघाडानंतर एमएमआरडीए प्रशासन खडबडून जागे झाले आहे. घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी एमएमआरडीएने अंशकालीन तसेच दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतल्या असून गाडीची प्रवासी क्षमता 102 ते 104 दरम्यान ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोनोरेलच्या सर्व गाड्यांची सुरक्षा तपासणी करण्यात येणार आहे.
भक्ति पार्क ते चेंबूर दरम्यान धावणारी मोनोरेल मैसूर कॉलोनी स्टेशन दरम्यान मंगळवारी बंद पडली. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याने मोनोरेलचा पॉवर रेल आणि करंट कलेक्टर यांच्यातील यांत्रिक संपर्क तुटला. ज्यामुळे मोनोरेलसाठी अत्यावश्यक असलेला वीजपुरवठा खंडित झाल्याने मोनो बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना थरारकरित्या वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले.
या घटनेनंतर एमएमआरडीए प्रशासनाने विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अतिरिक्त प्रवासी नियंत्रण करण्यात येणार आहे. मोनोरेलची क्षमता 104 टनांपर्यंत आहे. त्यामुळे गाडीत प्रवासी संख्येची मर्यादा ओलांडली जाऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे.
प्रवासी क्षमता 102 ते 104 दरम्यान इतकीच राहिल यापेक्षा वाढणार नाही यासाठी स्टेशनवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. गाडीत प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवून नंतरच गाडी पुढे सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच प्रत्येक ट्रेनमध्ये एक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. जो आतील गर्दीवर लक्ष ठेवेल. तसेच मोनो पायलटसह एक टेक्निशियनही पाठवला जाणार आहे.
प्रत्येक मोनोरेलमध्ये 4 डबे असून प्रत्येक डब्यात 2 व्हेंटिलेशन खिडक्या आहेत. या खिडक्यांची तातडीने तपासणी करून त्यांचे लेबलिंग करण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी घाबरुन न जाता संयम बाळगावा. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी काय करावे, सुरक्षित मार्ग कुठला आहे. याबाबत स्पष्ट माहिती असलेले सूचना फलक गाड्यांमध्ये लावण्यात आले आहेत. त्यात वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मोनोरेलसाठी नव्या १० गाड्या
मोनोरेलसाठी नव्या 10 गाड्या मागवण्यात आल्या आहेत. त्यापैकी 7 गाड्या डेपोमध्ये दाखल झाल्या असून त्यांची तपासणी आणि ट्रायल सुरू आहे. या ट्रायलनंतर सर्टिफिकेशन प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर या गाड्या सेवेत दाखल होतील.
हेही वाचा