Advertisement

२०२८पर्यंत 'बेस्ट'च्या सर्व बस धावणार विद्युत ऊर्जेवर

मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या सर्व बस २०२८ पर्यंत विद्युत ऊर्जेवर धावणाऱ्या अर्थात इलेक्ट्रीक असतील, अशी घोषणा पर्यावरण मंत्री, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

२०२८पर्यंत 'बेस्ट'च्या सर्व बस धावणार विद्युत ऊर्जेवर
SHARES

मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी वाढली आहे. परिणामी वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळं पर्यावरणाची हानी होत आहे. ही हानी टाळण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता मुंबईची दुसरी लाइफलाइन 'बेस्ट' विद्युत ऊर्जेवर धावणार आहे. मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या सर्व बस २०२८ पर्यंत विद्युत ऊर्जेवर धावणाऱ्या अर्थात इलेक्ट्रीक असतील, अशी घोषणा पर्यावरण मंत्री, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये महत्त्वाचे ठरणारे ३ नवीन उपक्रम राज्य पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेनं हाती घेतले आहेत. 'वुमन फॉर क्लायमेट', 'सिटीज फॉर फॉरेस्टस् कॅम्पेन' आणि 'ई-बस मिशन' असे हे ३ उपक्रम असून, या ३ही उपक्रमांच्या सामंजस्य करारांवर सोमवारी महापालिका मुख्यालयात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. बदलत्या वातावरणाशी जुळवून घेत, पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीनं मुंबई वातावरण कृती आराखडा बनविण्याची कार्यवाही सुरू आहे. त्या अंतर्गत ३ करार सोमवारी करण्यात आले.

'मुंबईतील बेस्ट उपक्रमामध्ये यापुढे दाखल होणारी प्रत्येक बस ही इलेक्ट्रीक असेल. २०२८ पर्यंत संपूर्ण बेस्ट बस ताफा हा इलेक्ट्रीक असेल. बेस्टच्या दुमजली गाड्या या इलेक्ट्रीक किंवा 'हायड्रोजन फ्युएल सेल' यापैकी जास्त सक्षम असेल, त्या ऊर्जेआधारे धावताना दिसतील', असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

खासगी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकित संस्थांसमवेत सामंजस्य करार केल्यानं, जगभरात जे सर्वोत्कृष्ट कार्य अशा संस्थांद्वारे होते, ते तंत्रज्ञान, अनुभव महानगरपालिका प्रशासनाला मिळू शकणार आहे, असे महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी यांनी म्हटलं.

शासनानं २०२५ पर्यंत १५ टक्के सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रीक वाहन आधारित करण्याचं उद्दिष्ट निश्चिात केलं आहे. महानगरपालिकेने २०२३ पर्यंत ५० टक्के सार्वजनिक वाहतूक  इलेक्ट्रीक वाहन आधारित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असेही ते म्हणाले. 

राज्य शासनानं जाहीर केलेल्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाला अनुसरुन बेस्ट उपक्रमाची वाटचाल सुरू आहे. बेस्टचा ताफ्यामध्ये यापुढे इलेक्ट्रीक वाहनेच समाविष्ट केले जातील. महानगरामध्ये इलेक्ट्रीक वाहने चार्ज करण्यासाठी ५५ ठिकाणे निवडली आहेत. तेथे खासगी-सार्वजनिक भागीदारीतून ३ ते ४ महिन्यात चार्जिंग स्टेशन उभे राहतील. यामुळे सर्वसामान्यांनाही वाहने चार्ज करण्याची सुविधा मिळेल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा