रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. अंधेरी ते विरार स्थानकादरम्यान १५ डब्याच्या धीम्या लोकल सोडण्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र कोरोनामुळं सध्या सामान्य प्रवाशांच्या लोकल प्रवासाला मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव धीम्या लोकल फेऱ्यांचा दिलासा तूर्तास तरी मिळणार नसल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.
पश्चिम रेल्वेच्या अंधेरी, बोरिवली, भाईंदर, मीरा रोड, विरारसारख्या स्थानकात प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीतील प्रवास जीवघेणाच बनत आहे. हा प्रवास सुकर करण्यासाठी अंधेरी ते विरार दरम्यान धिम्या मार्गावरही १५ डबा लोकल चालविण्याचे नियोजन साधारण तीन वर्षांपूर्वी करण्यात आले होते.
या प्रकल्पासाठी ५९ कोटी ५६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. फलाटांची लांबी वाढवणे, रेल्वे यार्ड, रूळ, ओव्हरहेड वायर अशी अनेक तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी करोनाकाळात मनुष्यबळाअभावी या कामांना काहीसा ब्रेक लागला होता. परंतु पावसाळ्यानंतर पुन्हा कामाला गती दिली गेली. जानेवारी २०२१ आणि त्यानंतर मार्च २०२१ पासून या मार्गावर वाढीव १५ म्डबा लोकल फेऱ्या चालवण्याचं नियोजनही करण्यात आले.
कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्यानं वाढत असल्यानं राज्य सरकारनं घातलेल्या निर्बंधामुळे १५ डब्यांच्या नवीन फेऱ्या सध्या तरी चालवणे शक्य नसल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते डहाणू, विरारसाठी १५ डबा जलद लोकल चालविल्या जातात. अंधेरी ते विरार १५ डबा धिम्या लोकल चालविल्यास प्रवाशांना त्याचा फायदा होईल.