Advertisement

मुंबईत रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ

मुंबईकरांना आरामदायी व जलद प्रवास देणाऱ्या रिक्षा व टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाली आहे.

SHARES

मुंबईकरांना आरामदायी व जलद प्रवास देणाऱ्या रिक्षा व टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू करण्यात आली असून, काळ्या-पिवळ्या रिक्षा-टॅक्सीतून सोमवार १ मार्चपासून प्रवास करणाऱ्या मुंबईतील प्रवाशांना नवीन भाडेदर द्यावा लागणार आहे. नवीन भाडेदरासाठी रिक्षा, टॅक्सींच्या मीटरमध्ये बदल करावे लागणार असल्यानं त्यासाठी ३ महिन्यांची मुदत दिली आहे. तोपर्यंत चालक भाडे दरपत्रकानुसारच प्रवाशांकडून भाडे वसुल करतील.

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मंजुरीनंतर सोमवारपासून दोन्ही सेवांच्या किमान भाडेदरात प्रत्येकी ३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं रिक्षाचं भाडं १८ रुपयांवरुन २१ रुपये आणि टॅक्सीचं भाडं २२ रुपयांवरुन २५ रुपये झालं आहे. परिणामी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

मुंबईतील ज्या भागात मीटर रिक्षा व टॅक्सी धावतात त्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवलहीसह अन्य हद्दीत ही वाढ लागू असेल. मागील ५ वर्षांत रिक्षा-टॅक्सी चालकांना भाडेवाढ देण्यात आलेली नाही. शिवाय करोनाकाळातही व्यवसाय कमी झाल्यानं त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्यामुळं वाहनांची सरासरी किंमत, विम्याचा हफ्ता, मोटर वाहन कर, व्यवसाय कर,ग्राहक निर्देशांक, वाहन कर्जाचा व्याजदर इत्यादी बाबी विचारात घेऊन खटुआ समितीच्या शिफारशींनुसार परिगणना करुन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं नवीन भाडेदर लागू केली आहे.

वर्षांतून एकदा जून महिन्याच्या पहिल्या तारखेस भाडेदरात सुधारणा करावी, अशी शिफारस समितीकडून करण्यात आली असून, ती देखिल लागू होणार आहे. मुंबई महानगरात सध्या ४ लाख ६० हजार रिक्षा आणि ६० हजार टॅक्सी आहेत.

काळी पिवळी टॅक्सी दर

किमी
सध्याचे दर
वाढीव दर
१.५०
२२ रु
२५ रु
२.५०
३७ रु 
४२ रु
३.५०
५२ रु
५९ रु
४.५०
६७ रु
७६ रु
५.५०
८२ रु
९३ रु

(रात्री १२ पासून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरुवातीच्या दिड किलोमीटरसाठी २८ रुपयांऐवजी ३२ रुपये भाडे द्यावे लागेल)

काळी-पिवळी रिक्षा दर

किमी
सध्याचे दर
वाढीव दर
१.५०
१८ रु
२१ रु
२.५०
३० रु
३६ रु
३.५०
४३ रु
५० रु
४.५०
५५ रु 
६४ रु
५.५० 
६७ रु
७८ रु

(रिक्षाचे रात्री १२ पासूनचे किमान दिड किलोमीटरचे भाडे २३ रुपयांवरुन २७ रुपये होईल)

सोमवारपासून नवीन भाडेदर लागू होणार आहेत. मात्र रिक्षा व टॅक्सींच्या मीटरमध्ये नवीन भाडेदर बदल करण्यास मे २०२१ पर्यंतचा कालावधी चालकांना परिवहन विभागाकडून देण्यात आला आहे. हा बदल होईपर्यंत चालक नवीन दरपत्रकानुसार प्रवाशांकडून भाडे घेऊ शकणार आहेत.

कुल कॅबचेही भाडे वाढणार

काळ्या-पिवळ्या टॅक्सींबरोबरच कुल कॅबचेही भाडे सोमवारपासून वाढणार आहे. त्याच्या किमान भाडेदरात पाच रुपयांनी वाढ केली आहे. याआधी कुल कॅबचे दिवसा दिड किलोमीटरसाठीचे किमान असलेले २८ रुपये भाडे ३३ रुपये आणि तर रात्रीचे भाडे ३५ रुपयांवरुन ४२ रुपये होईल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा