Advertisement

मुंबईकर बेहाल, सकाळपासून एकही बेस्ट बस रस्त्यावर नाही


मुंबईकर बेहाल, सकाळपासून एकही बेस्ट बस रस्त्यावर नाही
SHARES

बेस्टच्या संपाला मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरूवात झाली आहे . बेस्टचे सुमारे ३० हजार ५०० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. सध्या केवळ एक वाहक आणि ९ चालक कामावर आल्याची माहिती आहे. त्यामुळे सकाळपासून मुंबईच्या रस्त्यावर एकही बेस्ट बस धावलेली नसल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. कारण बेस्ट ही मुंबईची दुसरी लाईफलाइन मानली जाते. बेस्टमधून दररोज सुमारे २५ लाख प्रवाशी प्रवास करतात. या सर्व प्रवाशांना त्याचा आता चांगलाच फटका बसत आहे.




मनाई करूनही संप

२ वर्षांपासून रखडलेला वेतन करार आणि इतर प्रलंबित मागण्यासाठी बेस्ट कृती समितीने ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. हा संप होऊ नये यासाठी बेस्टने दोन बैठका घेतल्या. पण या दोन्ही बैठका निष्फळ ठरल्या. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्री बेस्टचे कर्मचारी संपावर गेले आहेत. दरम्यान औद्योगिक न्यायालयाने सोमवारी बेस्ट कर्मचाऱ्याना संपावर जाण्यास मनाई केली. पण त्यानंतरही बेस्ट कर्मचारी संपावर ठाम राहिले नि मध्यरात्रीपासून संपाला सुरवात केली आहे.


४०० मार्ग ठप्प

या संपामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील ४०० बेस्ट मार्ग ठप्प आहेत. बस नसल्याने प्रवाशांना रिक्षा, टॅक्सी आणि इतर पर्याय निवडावे लागत आहेत. पण वेळेवर रिक्षा-टॅक्सी मिळत नसल्याने प्रवाशी बेहाल आहेत. दरम्यान बेस्टनेकर्मचाऱ्याविरोधात मेस्मा लावण्याचा इशारा दिला आहे. पण या इशाऱ्याला झुगारुन कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.


विद्यार्थ्यांना दिलासा 

दिलासादायक बाब म्हणजे, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रावर उशीरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू द्यावं, असं पत्र मुंबई विद्यापीठानं जारी केलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या मंगळवारी एकूण १७ परीक्षा होणार असून यात लॉ, एमएस्सी, एमकॉम, बीएड यांसह विविध विभागांच्या परीक्षांचा समावेश आहे. यामुळं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा