Advertisement

मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी 'बेस्ट'


मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी 'बेस्ट'
SHARES

लोकलनंतर बेस्ट बसला मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून ओळखलं जातं. मात्र, मागील वर्षांपासून बेस्ट उपक्रम आर्थिक तोटा सहन करत आहे. या आर्थिक संकाटामुळं बेस्ट उपक्रमाला कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेत देता आले नसून, अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरं जाव लागतं आहे. त्याशिवाय, बेस्टच्या प्रवासी संख्याही कमी झाली आहे. त्यामुळं या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि प्रवासी संख्येत वाढ करण्यासाठी तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या भाडेकपातीच्या प्रस्तावाला बेस्ट समिती, महापालिका आणि आरटीएची देखील मंजुरी मिळाली आहे. नव्या प्रस्तावानुसार, ५ किमीपर्यंतच्या प्रवासासाठी ५ रुपये, १० किमीसाठी १० रुपये, १५ किमीपर्यंत १५ रुपये आणि १५ किमीपुढील अंतरासाठी २० रुपये तिकीट आकारलं जाणार आहे. तसंच, दैनंदिन पासचे दर ५० रुपये असणार आहेत.

बेस्टच्या ताफ्यात वाढ

बेस्टनं तिकीट दर कमी करावे, अशी मागणी गेले अनेक वर्ष प्रवासी करत होते. परंतु, आता बेस्ट उपक्रमाच्या भाडेकपातीच्या निर्णयामुळं मुंबईकरांची जुनी मागणी पूर्ण होणार आहे. दरम्यान, बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेनं बेस्टला दरमहा १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही अटीही बेस्टला घातल्या आहेत. या अटींनुसार ३ महिन्यांत बेस्टच्या बसगाड्यांचा ताफा ७ हजारांवर नेण्याची अट घातली आहे.

बेस्टकडे सध्या ३३३७ बसगाड्या आहेत. बेस्टनं प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी आणि उत्तम सुविधा देण्यासाठी बसताफा ७ हजारांपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यातील भाडेतत्त्वावरील ५३० बस पहिल्या टप्यात दाखल होणार आहेत. बेस्टमधील बसची संख्या वाढविताना उपक्रमाकडून प्रयत्न सुरू आहेत. तसंच, त्याचाच भाग म्हणून एसी हजार मिडी, मिनी बस घेण्यात येणार आहेत. त्यासह महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बस चालविण्यात येत आहे. अशा ३७ तेजस्विनी बस सेवेत येणार असून त्या केवळ महिला प्रवाशांसाठी चालविल्या जाणार आहेत. राज्य सरकारकडून तेजस्विनी बससेवेसाठी ११ कोटी रुपयांचे अनुदान बेस्टला देण्यात आलं आहे. गर्दीच्या ठिकाणी महिला प्रवाशांसाठी या बससेवा चालविण्याचे धोरण बेस्टचं आहे.

बस थांब्यांवर गर्दी

मुंबईत दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढत आहे. या वाढत्या गर्दीमुळं बस थांब्यांवरही प्रवासी वाढत आहेत. मात्र, बेस्टच्या ताफ्यात फक्त ३३३७ बस गाड्या असल्यानं प्रवाशांना सुरक्षित आणि चांगली सुविधा देणं बेस्ट उपक्रमाला कठीण होत आहे. त्याशिवाय, प्रवासी जास्त आणि बसेस कमी असल्यानंही अनेकांनी बेस्टकडं पाठ फिरवली आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून प्रवासी रिक्षा-टॅक्सीचा वापर करतात. तसंच, काही प्रवासी अॅप आधारीत ओला आणि उबेरचा वापर करतात. मात्र, या प्रवासासाठी प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागतात. 

कमी पैशात प्रवास

मात्र, बेस्टच्या ताफ्यात होणाऱ्या वाढीमुळं आणि तिकीट दर कमी केल्यानं प्रवाशांना कमी पैशात प्रवास करता येणार आहे. तसंच, बेस्टच्या उत्पन्नातही वाढ हेणार असून, प्रवासी संख्येत वाढ होणार आहे. उत्पन्नात होणाऱ्या वाढीमुळं बेस्टला कर्मचाऱ्यांना पगारही वेळेत देता येणार आहे. 

खासगीकरणाला विरोध

दरम्यान, बेस्टच्या खासगीकरणाला बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं सुरूवातील विरोध केला होता. मात्र महापालिकेनं मागण्या मान्य केल्यानं समितीनं खासगीकरणाला असलेला विरोध मागे घेतला. एप्रिल २००७पासून भरती झालेल्या कामगारांना मे महिन्यातील पगारात गेल्या १० टप्प्यांतील वाढ द्यावी, कामगार करारासाठी वाटाघाटींना सुरुवात करावी, बेस्ट उपक्रमास झालेला तोटा पालिकेनं भरून द्यावा, बेस्टच्या मालकीच्या ३३३७ बस आणि कर्मचारी सेवेत कायम ठेवणं, बसखरेदीसाठी पालिकेनं निधी द्यावा, निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी सप्टेंबरपर्यंत द्यावीत, जानेवारीमध्ये झालेल्या आंदोलनातील कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करू नये, या मागण्या मान्य असल्याचं आयुक्तांनी लेखी पत्र द्यावे, अशा १० मागण्या करण्यात आल्या होत्या. त्या पालिकेनं मान्य केल्यानं कर्मचाऱ्यांनी विरोध मागे घेतला.

बेस्ट बसचे तिकीट दर कमी केल्यानं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तसंच महापालिका बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी दरमहा १०० कोटी रूपये देणार आहे. त्यामुळं येत्या काळात प्रवाशांना बेस्ट उपक्रम चांगली सुविधा देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  

 


हेही वाचा -

मध्य रेल्वेचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

पहिल्या सहामाहीत मराठी चित्रपटसृष्टी पास की नापास?संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा