Advertisement

पहिल्या सहामाहीत मराठी चित्रपटसृष्टी पास की नापास?

देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांसोबतच राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही मराठीचा झेंडा फडकत आहे. असं असलं तरी यंदा केवळ चारच मराठी चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला आहे. त्यामुळं पहिल्या सहामाहीत मराठी चित्रपटसृष्टी पास की नापास? हा प्रश्न उपस्थित होतो.

पहिल्या सहामाहीत मराठी चित्रपटसृष्टी पास की नापास?
SHARES

मराठी चित्रपटांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांसोबतच राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही मराठीचा झेंडा फडकत आहे. असं असलं तरी यंदा केवळ चारच मराठी चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला आहे. त्यामुळं पहिल्या सहामाहीत मराठी चित्रपटसृष्टी पास की नापास? हा प्रश्न उपस्थित होतो.


चार चित्रपटांचा व्यवसाय 

मराठी चित्रपटसृष्टीनं वर्षाला शतकी आकडा कधीच पार केला आहे. पूर्वी जिथं सहा महिन्यांमध्ये म्हणजेच जानेवारी ते जूनपर्यंत पंचवीसेक चित्रपट प्रदर्शित व्हायचे, तिथं हळूहळू हा आकडा पन्नासपर्यंत पोहोचला. यंदा तर पहिल्या सहा महिन्यांमध्येच मराठी चित्रपटांनी सत्तरी पार केली आहे. त्या तुलनेत मराठी चित्रपटांचं तिकिटबारीवरील यश फार मोठं नक्कीच नाही. कारण यंदाच्या पहिल्या सहामाहीमध्ये केवळ चार मराठी चित्रपटांनी तिकीटबारीवर चांगला व्यवसाय केला आहे. पहिली सहामाही संपता संपता मागच्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'टकाटक' या चित्रपटानं चांगला गल्ला जमवल्यानं हा आकडा चारपर्यंत पोहोचू शकला. त्यापूर्वीपर्यंत तीनच चित्रपटांनी यश मिळवलं होतं.


बायोपीकची बाजी

प्रेक्षकांना कधी काय आवडेल याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. याचा प्रत्यय बऱ्याचदा आला आहे. नवा ट्रेंड सेट करत ज्या चित्रपटानं आपलं वेगळेपण सिद्ध केलं तो प्रेक्षकांना आवडला. यासोबतच बहुचर्चित, ऐतिहासिक तसंच लोकप्रिय राजकीय व्यक्तिमत्त्वांवरील बायोपीकनं बाजी मारल्याचं चित्र यंदा मराठी चित्रपटसृष्टीत पहायला मिळत आहे. यात दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा पु.ल. देशपांडेंच्या जीवनावरील 'भाई - व्यक्ती की वल्ली : पूर्वार्ध', समीर विद्वांसचा आनंदी गोपाळ जोशी या भारतातील पहिल्या महिला डॅाक्टरवरील  'आनंदी गोपाळ' आणि अभिजीत पानसेनं दिग्दर्शित केलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या 'ठाकरे' या चित्रपटाचा समावेश आहे.


दिवसात ३ कोटी

या सर्वांमध्ये जून महिना संपता संपता प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक मिलिंद कवडेच्या 'टकाटक' या चित्रपटानं आश्चर्यकारकरीत्या बॅाक्स आॅफिसवर धमाल उडवून दिली आहे. सेक्स कॅामेडी असलेल्या या चित्रपटानं पहिल्या शोपासूनच प्रेक्षकांचा कौल मिळवत पुन्हा एकदा प्रेक्षकांना नेमकं काय आवडतं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांना भाग पाडलं आहे. पहिल्या तीन दिवसांमध्ये तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवत 'टकाटक'नं यशाचं एक नवं समीकरण सेट केलं आहे. प्रदर्शित होईपर्यंत हा चित्रपट प्रेक्षक कशाप्रकारे स्वीकारतील याबाबत 'टकाटक' चित्रपटाच्या टीमच्या मनात संभ्रम होता, पण रसिकांच्या मनात काही वेगळंच होतं.


 ७३ चित्रपट प्रदर्शित

जानेवारीपासून जूनपर्यंत महाराष्ट्रात जवळजवळ ७३ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. जानेवारीमध्ये सोहळा, भाई - व्यक्ती की वल्ली : पूर्वार्ध, थापाड्या, जिवा शिवा, फाईट, नशिबवान, बॅलन्स, मुंबई आपलीच आहे, लव्ह यू जिंदगी, एक निर्णय, कृतांत, ठाकरे... फेब्रुवारीमध्ये मीपण सचिन, धप्पा, सर्व लाईन व्यस्त आहेत, युथट्युब, कर्मचक्र, सन १९८०, दिव्यांग, मुंबईचा किनारा, भाई - व्यक्ती की वल्ली : उत्तरार्ध, लकी, रेडीमिक्स, आसूड, दहावी, धरपड, प्रेमरंग, प्रेमवारी, उनाड मस्ती, आनंदी गोपाळ, शिवा, भेद, डोंबिवली रिटर्न, उन्मत्त, अशी ही आशिकी... मार्चमध्ये परफ्युम, डोक्याला शॅाट, प्रेमाचा राडा, ती अँड ती, कॅालेज डायरी, रॅाकी, शिमगा, छत्रपती शासन, सूर सपाटा, आम्ही बेफिकीर, मेनका उर्वशी... एप्रिलमध्ये सावट, धुमस, वेडींगचा शिनेमा, एचटूओ, काही क्षण प्रेमाचे, रमाई, मिरांडा हाऊस, कागर... मेमध्ये बाळा, भीमराव, ६६ सदाशीव, पुरुषोत्तम, एक होतं पाणी, हलगी, रंपाट, जजमेंट, तांडव, बोला अलखनिरंजन, बाबो... जूनमध्ये वेलकम होम, मोगरा फुलला, परकिया, बंदिशाळा, मी तुझीच रे, अधम, टकाटक आणि मिस यू मिस्टर हे चित्रपट रिलीज झाले आहेत.


केवळ चार यशस्वी 

वरील चित्र पाहता जानेवारीपासून जवळजवळ ७२ चित्रपट प्रदर्शित झाले; परंतु केवळ चार यशस्वी झाले. यशाच्या गुणोत्तराचं हे प्रमाण असमतोल आहे. यशाचा रेशो वाढण्यासाठी काय करायला हवं याचं चिंतन मराठी निर्माता-दिग्दर्शकांनी करण्याची गरज आहे. केवळ चित्रपटांची संख्या वाढून मराठी चित्रपट मोठा होणार नसून, बॅाक्स आॅफिसवरील आकडेही तितकेच मोठे होण्याची गरज असल्याची जाणीव झाली तरच हे समीकरण बदलू शकतं. यासाठी दर्जेदार, आशयघन, नावीन्यपूर्ण चित्रपटांच्या निर्मितीला प्राधान्य देण्याची गरज आहे. चांगलं असेल आणि कमी खर्चून जरी बनवलेलं असेल तरी ते पहायला प्रेक्षक येतात हे आजवर सर्वांनीच पाहिलं आहे. 


मोठे चित्रपट येणार

२०१९ मध्ये उरलेल्या सहा महिन्यातही बरेच मोठे मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हे सर्वच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील असा दावा प्रत्येक चित्रपटाचा दिग्दर्शक करत आहे, पण प्रेक्षकांचा कौल कोणाला मिळतो यावरील २०१९ पुढील मधील उरलेल्या सहामाहीतील मराठी चित्रपटांचं भविष्य अवलंबून असल्याचं सत्य नाकारता येण्याजोगं नाही.



हेही वाचा -

सुरेखा पुणेकर का आणि कोणावर झाल्या नाराज?

Movie Review : 'उधळ'लाच नाही 'मलाल'चा 'गुलाल'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा