Advertisement

Movie Review : 'उधळ'लाच नाही 'मलाल'चा 'गुलाल'

एका नव्या कोऱ्या जोडीच्या प्रेमानं उधळलेल्या गुलालाची गुलाबी कथा पहायला मिळेल अशी अपेक्षा होती, पण या चित्रपटात तसं काहीच नसल्याचा 'मलाल' चित्रपटगृहातून बाहेर पडताना मनात राहतो.

Movie Review : 'उधळ'लाच नाही 'मलाल'चा 'गुलाल'
SHARES

८०-९०च्या दशकापासून आपण रुपेरी पडद्यावर चाळीत राहणाऱ्या नायकाची कथा पहात आलो आहोत. दिग्दर्शक मंगेश हाडवळेच्या या चित्रपटातही १९९८ मधील कथा आहे. संजय लीला भन्साळींसारख्या निर्मात्याचा चित्रपट, एक नवी कोरी जोडी आणि 'टिंग्या' या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या मंगेश हाडवळेचा हिंदी सिनेमा या कारणांमुळं या चित्रपटाबाबत उत्सुकता होती. एका नव्या कोऱ्या जोडीच्या प्रेमानं उधळलेल्या गुलालाची गुलाबी कथा पहायला मिळेल अशी अपेक्षा होती, पण या चित्रपटात तसं काहीच नसल्याचा 'मलाल' चित्रपटगृहातून बाहेर पडताना मनात राहतो.

मुंबईतील काळेवाडीतील एका चाळीत राहणाऱ्या शिवा मोरेची (मीझान जाफरी) ही कथा आहे. वडीलांचं शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं उच्चभ्रू वस्तीत वाढलेली आस्था त्रिपाठी (शर्मिन सेगल) शिवा रहात असलेल्या चाळीत रहायला येते. वडीलांवर हात उगारणारा, बेरोजगार, दारू पिऊन दंगा करणारा शिवा कॅार्पोरेटर सावंतच्या (समीर धर्माधिकारी) चिथावणीमुळं अमराठीद्वेष्टा बनतो. त्यामुळं अमराठी असलेल्या नायिकेलाही सुरुवातीला तो त्रास देतो, पण हळूहळू दोघांमध्ये मैत्री होते. ही मैत्री कधी प्रेमात बदलते ते त्यांचं त्यांनाच समजत नाही, पण आस्थाच्या आई-वडीलांनी तिचं लग्न अमेरिकेहून परतलेल्या एक तरुणाशी पक्कं केलेलं असतं. अशा परिस्थितीत शिवा आणि आस्थाचं प्रेम काय करतं ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

चाळीत राहणाऱ्या बिघडलेल्या नायकाची कहाणी आजवर अनेकदा रुपेरी पडद्यावर आली आहे, पण त्यातही काही वेगळे, दुर्लक्षित पैलू या चित्रपटात सादर केले जाण्याची अपेक्षा होती. पटकथा लेखनातील ढिलाई, अशुद्ध संवादोच्चार या मुख्य चुकांसोबतच या चित्रपटात बऱ्याच उणीवा राहिल्याचं जाणवतं. एक चाळीत राहणारा मराठी तरुण 'चाळ' (हिंदीत 'चाल') म्हणण्याऐवजी 'चॅाल' असा इंग्रजाळलेला उच्चार कसा काय करू शकतो? आज जरी मुंबईतून चाळ संस्कृती हद्दपार होत असली तरी वास्तवात चाळीत राहिलेल्यांना हे पटणारं नाही. बेरोजगार असणारा, दारू पिऊन राडा करणारा शिवा अचानक परीक्षा द्यायला जातो हे सुद्धा पटत नाही. त्यागातही खरं प्रेम असतं हा चांगला विचार या चित्रपटात अधोरेखित करण्यात आला आहे.

चित्रपटाची सुरुवात गल्ली क्रिकेट मॅचनं होते. शिवा फलंदाजी करत असतो. शेवटच्या चेंडूवर चार धावा करायच्या असतात. अंपायर इशाऱ्यानं गोलंदाजाला वाईड बॅाल टाकायला सांगतो. त्यानंतर मॅच हरल्यानं शिवा अंपायला मारतो, पण मुद्दा असा आहे की, शेवटचा बॅाल जर वाईड टाकला, तर जिंकण्यासाठी पुन्हा एक अतिरीक्त चेंडू टाकायला हवा आणि फलंदाजी करणाऱ्या टिमचा एक रन वाढायला हवा. असं असताना शिवाची टीम मॅच हरते आणि त्या रागात तो अंपायरची धुलाई करतो हे काहीसं विसंगत वाटतं. कॅार्पोरेटर सावंतचा ट्रॅक, त्याचा मराठीचा मुद्दा, नायकाचं त्याच्यासाठी काम करणं आणि पुन्हा सोडणं हे कथेच्या दृष्टिकोनातून अनावश्यक वाटतं. चाळीत राहणाऱ्या एका वाया गेलेल्या तरुणाच्या आयुष्यात एक तरुणी येते आणि तिच्यामुळं तो इतका सुधारतो की शिखरावर पोहोचतो हा या चित्रपटातील विचार खूप मोलाचा आहे.

गणेशोत्सव तसंच दिवाळीसारख्या मराठमोळ्या सणांच्या सहाय्यानं मराठमोळी वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे. क्लायमॅक्समधील सीन मनाला चटका लावणारा असला तरी छान झाला आहे. मराठी शब्द गुंफलेल्या 'उधळ हो...' आणि 'आई शप्पथ...' या गाण्यांसोबत चित्रपटाच्या अखेरीस असलेलं 'एक मलाल...' हे टायटल ट्रॅकही छान आहे. तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट सक्षम असला तरी, चित्रपटाची कथा १९९८ मधील असल्याचं भान ठेवणं गरजेचं होतं. ते न राखल्यानं १९९८ मधील कथेत २०१९ मधील कॅास्च्युम परिधान केलेले नायक-नायिका पहायला मिळतात. दिग्दर्शक या नात्यानं मंगेशकडून बऱ्याच उणीवा राहिल्या आहेत, त्या नसत्या तर एक चांगला चित्रपट पाहिल्याचं समाधान लाभलं असतं.

मीझान जाफरीनं पहिल्याच चित्रपटात प्रभावित केलं आहे. रणबीर कपूर आणि संजय दत्त यांचं काहीसं कॅाम्बिनेशन असलेल्या मीझाननं शिवाची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं जाणवतं. मीझानच्या तुलनेत शर्मिन सेगलचा आत्मविश्वास थोडा कमी असल्याचं जाणवलं. आस्थाची व्यक्तिरेखा तिनं आणखी चांगल्या प्रकारे खुलवण्याची गरज होती. मीझानच्या जोडीला तिनं चांगला डान्स केला असला तरी तिला आणखी शिकण्याची गरज आहे. समीर धर्माधिकारीची भूमिका तशी फारशी महत्त्वाची नव्हतीच, पण त्यानं ती चांगल्या प्रकारे साकारली आहे. चिन्मयी सुमीत, चेतन चिटणीस, सुयश झुंझुरके या मराठी कलाकारांनीही चांगलं काम केलं आहे.

आई-वडीलांच्या मायेखातर खऱ्या प्रेमाला तिलांजली देणाऱ्या तरुणीची कथा आणि पदार्पणातच मीझाननं केलेल्या दमदार अभिनयासाठी हा चित्रपट पहायला हरकत नाही.

.....................................

हिंदी चित्रपट : मलाल

निर्माता :  संजय लीला भन्साळी, भूषण कुमार, क्रिशन कुमार, महावीर जैन

पटकथा : मंगेश हाडवळे, संजीव, संजय लीला भन्साळी

दिग्दर्शक : मंगेश हाडवळे

कलाकार : मीझान जाफरी, शर्मिन सेगल, समीर धर्माधिकारी, अंकुष बिष्ट, चिन्मयी सुमीत, चेतन चिटणीस, सुयश झुंझुरके



हेही वाचा -

मुंबई पोलिसांनी वाचवले परदेशी नागरिकाचे प्राण

केंद्रीय अर्थसंकल्प २०१९ः ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, श्रीमंतावरील कराचा बोजा मात्र वाढवला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा