Advertisement

मध्य रेल्वेचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार मध्य रेल्वेनं बुधवारी चक्क रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवल्या. या गोष्टीची कल्पना नसल्यामुळं अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली होता. अगदी चेंगराचेंगरीची घटना घडे

मध्य रेल्वेचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ
SHARES

मुंबईत सलग ५ दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळं मध्य रेल्वेचे तीन तेरा वाजल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसानं मंगळवारी विश्रांती न घेतल्यामुळं त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर झाला. मध्य रेल्वे मार्गावरील सायन, कुर्ला, माटुंगा, ठाणे यांसह अनेक स्थानकातील रुळ पाण्याखाली गेले होते. त्यामुळं मध्य रेल्वेनं अनेक गाड्या रद्द केल्या. काही गाड्या तब्बल ४० ते ४५ मिनिटं उशिरानं धावत होत्या. मात्र पावसाळ्यापूर्वी मध्य रेल्वे प्रशासनानं पावसात रेल्वे रुळ पाण्याखाली जावू नये यासाठी अनेक यंत्रणांचा वापर केला होता. तसंच, नाल्यांची सफाई झाली असून यंदाच्या पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी तुंबणार नाही असा दावाही केला होता. मात्र, मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळं मध्य रेल्वेचा हा दाव फोल ठरला आहे. त्याशिवाय, प्रवाशांनी 'मरे'च्या ढिसाळ कारबाराबाबत संताप व्यक्त केला.

वाहतूक ठप्प

मुंबईत सोमवारी रात्री पासून पडत असलेल्या पावसामुळं मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे स्थानकांवरही प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली होती. यावेळी प्रवाशांनी स्थानकावरचं मुक्काम करण्याचं पसंत केलं होतं. मुसळधार पावसामुळं मुंबईसह उपनगरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. रेल्वेसह रस्ते वाहतूकीलाही ब्रेक लागला होता. त्यामुळं रहिवाशांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारनं मंगळवारी २ जुलै रोजी सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केली. त्यामुळं मुंबईकरांसह चाकरमान्यांना दिलासा मिळाला. परंतु, मंगळवारी सार्वजनिक सुट्टीनंतर बुधवारी कामाला जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना मध्य रेल्वेचं नवीन नाटक पाहायला मिळालं. हवामान खात्यानं व्यक्त केलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार मध्य रेल्वेनं बुधवारी चक्क रविवारच्या (मेगाब्लॉक) वेळापत्रकानुसार लोकल चालवल्या. या गोष्टीची कल्पना नसल्यामुळं अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली होता. अगदी चेंगराचेंगरीची घटना घडेल अशी गर्दी जमली होती.

स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

मध्य रेल्वेनं बुधवारी रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या चालविण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळं सकाळी ८ च्यानंतर सर्वच स्थानकांमधील गर्दी वाढत गेली. ९ च्यानंतर तर ठाणे, डोंबिवलीसारख्या स्थानकात लोकलमध्ये चढताना प्रवाशांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन शिरावं लागत होतं. लोकलमध्ये चढण्या-उतरण्यावरून झालेल्या झुंबडीत अनेक महिला, वृद्ध, रुग्ण, अंपग प्रवाशांचे हाल झाले. प्रवाशांचे होणारे हाल आणि उशिरानं जाग आलेल्या रेल्वे प्रशासनानं रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालविण्याचा निर्णय मागे घेतला. परंतु, 'मरे'नं हा निर्णय दुपारी घेतल्यामुळं अनेक प्रवाशांना लेट मार्कचा सामना करावा लागला. स्थानकांत प्रचंड गर्दी असल्यामुळं काही प्रवाशांचा श्वास कोंडला जात होता. स्थानके गर्दीनं गच्च भरल्यानं प्रवाशांनी हलायलाही जागा नव्हती. त्यामुळं प्रवाशांना भोवळ येणं, चेंगराचेंगरीत जखमी होणं असे प्रकार घडत होते. लोकल भरून येत असल्यामुळं प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत होते.

प्रवाशांच्या जीवाशी खेळ

हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं मध्य रेल्वेनं बुधवारी रविवारच्या वेळापत्रक लोकल चालविल्या. मात्र, मध्य रेल्वेनं ऐन पावसाळ्यातही प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याचं चित्र समोर येत आहे. हवामान खात्यानं आपण मुसळधार पावसाचा इशारा दिलाच नाही असं स्पष्ट केलं आहे. भारतीय हवामान खात्याचे उप महासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करत मुंबईत मुसळधार पावसाचा इशाराच दिला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सर्व संबंधित यंत्रणांना ३ जुलै रोजी मुसळधार पाऊस होणार नसल्याचं कळवण्यात आलं होतं, अशी माहितीही त्यांनी दिली होती. आता अनेक प्रवासी मध्य रेल्वेच्या या कारभारावर संताप व्यक्त करत आहेत.

रेल्वे रुळ पाण्याखाली

पावसाळ्यापूर्वी मध्य रेल्वेनं नाल्यांची सफाई पूर्ण झाली असून स्थानकांत पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपही लावल्याची माहिती दिली होती. तसंच यंदाच्या पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचणार नाही असा दावाही केला होता. पंरतु, मध्य रेल्वेची सर्व उपकरणं पोल ठरली. प्रवाशांना दरवर्षीप्रमाणं रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. मागील वर्षी मुलंड स्थानकात पावसाची रेल्वे रुळांवर धबधब्याप्रमाणं येत होतं. त्याचप्रमाणं यंदाही असा धबधबा ठाणे स्थानकात पाहायला मिळाला.

मध्य रेल्वेला अल्टिमेटम

पावसाळ्यापूर्वी मध्य रेल्वेची वाहतूक सलग ५ दिवस विस्कळीत झाली होती. सिग्नल यंत्रणेत बिघाड, ओव्हरहेड वायर तुटली, रेल्वे रुळाला तडा यांसारख्य विविध कारणांमुळं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेची वाहतूक ४० ते ४५ मिनिटं उशिरानं धावत असल्यामुळं संतापलेल्या प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना (डीआरएम) भेटून १० दिवसांचा 'अल्टिमेटम' दिला होता. टिटवाळ्याचे रहिवासी शेखर कापुरे यांनी गुरुवारी आपल्या सहप्रवाशांसह मध्य रेल्वेला अल्टिमेटम दिला असून, १० दिवसांत या नोटिसला उत्तर न दिल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशाराही दिला होता.

१०० दिवसांत सुधारणा

यावर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन आणि मुंबई उपनगरीय मार्गावरील १५ प्रवासी संघटनांची तब्बल ३.३० तासांची बैठक झाली. या बैठकीमध्ये मध्य रेल्वे प्रशासनानं मान्सून तयारी, उन्हाळी विशेष मेल एक्स्प्रेस आणि तांत्रिक बिघाडामुळं मध्य रेल्वे उशीरानं चालविण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण प्रवासी संघटनेला दिलं. मुंबई उपनगरी लोकल पूर्णपणे वेळेवर धावण्यासाठी किमान १०० दिवसांचा कालावधी अपेक्षित असल्याचंही रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवासी संघटनांना सांगितलं. त्यामुळं प्रवासी संघटनांनी १ जुलै रोजी करण्यात येणारे आंदोलन मागे घेतलं. मात्र १०० दिवसांत सुधारणा झाली नाही, तर प्रवासी संघटना पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या बैठकीदरम्यान मध्य रेल्वे प्रशासनानं प्रवासी संघटनांना मान्सून तयारीबाबत म्हटलं होतं. परंतु पहिल्याच पावसात मध्य रेल्वेची मान्सून तयारी पाहायला मिळाली. स्थाकांत पाणी, प्रवाशांचे हाल, रेल्वे रुळ पाण्याखाली यांसारख्या घटना पहिल्याच घडल्यानं आणखी तीन महिने काय होणार असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. त्याचप्रमाणं मध्य रेल्वेनं प्रवासी संघटनांना बदलासाठी १०० दिवसांच वेळ अपेक्षित असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं या कालावधीत रेल्वे बदल घडवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आंदोलनंरेल रोको

मुंबईकर कामाला वेळेत पोहोचण्यासठी सकाळी घर लवकर सोडतो. घरातून बाहेर पडल्यावर रिक्षा-टॅक्सी यांचा मिळणारा नकार आणि स्थानकात रेल्वे उशिरानं धावतं असल्याच्या ऐकायला येणाऱ्या उद्घोषणांमुळं चाकरमानी नाराजी व्यक्त करत आहे. लेट मार्क टाळण्यासाठी अनेक प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतो. कुणी दरवाजात लटकतो, तर कुणी लोकलच्या दोन डब्यांच्यामधल्या भागात उभा राहून प्रवास करतो. याच कारण म्हणजे ऑफिसला वेळेत पोहोचणं. या एका कारणामुळं प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो, तर काही जखमी होतात. या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी प्रवासी संघटना आंदोलनं, रेल रोको करतात.

प्रवाशांची गैरसोय

छत्रपती शिवजी महाराज टर्मिनस (सीएमएमटी) येथील हिमालय पूलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं ११९ पादचारी पूल आणि वाहतुकीच्या पूलांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे. रेल्वे स्थानकांवरील छतांच्या दुरुस्तीचं काम देखील सुरू असल्यानं प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वेनं पुलांसह छत आणि इतर डागडुजींच्या कामांना एकाच वेळी सुरुवात केल्यानं प्रवाशांना रेल्वे स्थानकात धक्काबुक्कीला सामोर जावं लागतं आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मध्य रेल्वे मार्गावरील रुळ पाण्याखाली जातात. लोकल रद्द केल्या जातात. यामुळं प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. त्यामुळं येत्या काळात मध्य रेल्वे प्रशासन प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूकीचं नियोजन व्यवस्थित करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

पश्चिम रेल्वे पुलांच्या बांधकामावेळी करणार कार्बनचा वापर

Video: मुसळधार पावसात मुंबईची वाताहात, म्हणून राज ठाकरेंचं 'हे' वक्तव्य ठरतंय महत्त्वाचं



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा