Advertisement

ही जागा मालकाच्या ताब्यात, बेस्ट समितीने दिली मान्यता


ही जागा मालकाच्या ताब्यात, बेस्ट समितीने दिली मान्यता
SHARES

ताडदेव येथील बेस्टच्या सब स्टेशनची (उपकेंद्र) जागा संबंधित जमीन मालकाला परत देण्याचा निर्णय बेस्ट समितीने घेतला आहे. बेस्टने सब स्टेशनची जागा रिकामी करून द्यावी किंवा जमीन मालकाने दिलेल्या तीन पर्यायांपैकी एक पर्याय स्वीकारावा, अशा प्रकारची अट घालण्यात आली होती. पण जमीन मालकाचा पर्याय स्वीकारणे शक्य नसल्यामुळे अखेर ही जागा रिकामी करून देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यामुळे अशा प्रकारे भाडेकरारावर घेण्यात आलेल्या आणि मुदत संपलेल्या अनेक सब स्टेशनच्या जागा परत देण्याची वेळ बेस्टवर येणार आहे.


म्हणून बेस्ट समितीची बैठक घेतली

ताडदेव येथील सुमारे १३१ स्क्वेअर यार्ड भूखंडावर बेस्ट उपक्रमाचं सब स्टेशन आहे. सब स्टेशनला तो १८ ऑगस्ट १९५०मध्ये देण्यात आला होता. त्यानंतर या जागेचा करार २९ एप्रिल १९७३ ला संपुष्टात आला. परंतु, प्रत्यक्षात उपक्रमाला भाडेपट्टा समाप्तीची नोटीस १४ मार्च २००७ मध्ये बेस्टला पाठवण्यात आली. त्यानंतर जागेचे मालक असलेल्या जसोदाबेन कांतिलाल पटेल यांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली. यावेळी न्यायालयाने मागील दीर्घ कालावधीपासून बेस्ट उपक्रम हे भाडेपट्टा तत्वावर असून उपकेंद्राची जागा ताब्यात ठेवून उपक्रमाने नियमाचे उल्लंघन केलेले आहे. त्यामुळे न्यायालयासमोर याचिकाकर्त्यांकडून ठेवण्यात आलेल्या पर्यायाबाबत निर्णय घेण्याकरता सोमवारी ४ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी तातडीने बेस्ट समितीची बैठक आयोजित करण्याचे निर्देश न्यायालयाने उपक्रमाला दिले होते. त्यानुसार बेस्ट समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


बेस्टकडे वाढीव भाडे मागण्याची शक्यता

यावेळी बेस्ट समिती सदस्य आणि महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी बेस्टच्या झोपी गेलेल्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. जमीन मालकाने २००७ पासून जमिनीचे भाडे आणि पुढील प्रत्येक महिन्याला दीड लाख रुपये भाडे देण्याची अट ठेवली होती. पण ही अट मान्य करणे बेस्टला आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्यामुळे सोमवारी मालकाला जागा परत करण्याचा निर्णय समितीत घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे भाडेकरार संपलेल्या सबस्टेशनच्या जमिनीचे मालक बेस्टकडे वाढीव भाडे मागण्याची शक्यता आहे. सध्या सुमारे २ हजार सबस्टेशन असून त्यांच्या जागा भाडेतत्वावर घेण्यात आल्या असल्याचेही रवी राजा यांनी निदर्शनास आणले.



हेही वाचा

बेस्टच्या कामगारांचं दिवाळं, डिसेंबरपासून कापून घेणार दिवाळीची उचल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा