Advertisement

महाव्यवस्थापकांचा परदेश दौरा बेस्ट समितीने रोखला


महाव्यवस्थापकांचा परदेश दौरा बेस्ट समितीने रोखला
SHARES

एकीकडे बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात सापडले आहे. अशात बेस्टचे महाव्यवस्थापक ऑस्ट्रेलियाच्या अभ्यास दौऱ्यावर जाण्याची स्वप्ने पाहत आहेत. मात्र, त्यांची ही स्वप्ने बेस्ट समितीनं पूर्ण होऊ न देता त्यांच्या परदेश दौऱ्यालाच लगाम घातला आहे. काँग्रेससह भाजपा आणि शिवसेनेच्या सदस्यांनी तीव्र विरोध केल्यानंतर महाव्यवस्थापकांचा हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे.


दौरा कशासाठी?

राज्य मार्ग परिवहन उपक्रम महामंडळ विकास योजनेंतर्गत १५ ते १९ जानेवारी २०१८च्या कालावधीत ऑस्ट्रेलिया आणि जवळपासच्या शहरांमध्ये तांत्रिक बाबींकरता भेट देण्यासाठी परदेश अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये अत्यंत प्रगत सार्वजनिक परिवहन पद्धती प्रत्यक्ष पाहण्याकरता तसेच त्याबाबत शिकण्याकरता उपक्रमाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी उत्कृष्ठ संधी प्राप्त होणार आहे. याशिवाय आयटीएस अॅप्लिकेशन यांचा अभ्यास करण्याची तसंच सार्वजनिक मार्ग परिवहन क्षेत्रामध्ये अलिकडे झालेल्या विकासाबाबत जाणून घेण्याची संधी असल्यामुळे बेस्टच्या महाव्यवस्थापकांची या परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी प्रतिनियुक्ती करण्यात येत आहे.


अशा परिस्थितीत परदेश दौरा का?

याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीपुढे मंजुरीला आला असता, विरोधी पक्षनेते तसेच समिती सदस्य रवी राजा यांनी जोरदार आक्षेप घेतला. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मागील महिन्यात बेस्टबाबत निवेदन करताना बेस्ट आर्थिक संकटात असून पुढे चालवणे कठीण असल्याचे भाकीत केलं. त्यामुळे बेस्ट बंद होण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थिती बेस्टचे महाव्यवस्थापक हे परदेश दौऱ्यावर कसे जाऊ शकतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


खर्च करणार कोण?

या सार्वजनिक परिवहन सेवेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. परंतु त्यासाठी महाव्यवस्थापकांनी जाण्याची काहीही गरज नाही. यापेक्षा जर याचा सर्व खर्च करणार असतील तर यासाठी उपक्रमातील सर्वात अनुभवी अशा अधिकाऱ्याला तिथे पाठवण्यात यावे. जेणेकरून ते आपला अहवाल बेस्ट समितीला तरी देतील आणि भविष्यात त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न तरी करतील, असे त्यांनी सांगितले. याला भाजपाचे सुनील गणाचार्य, राजेश कुसळे आदी सदस्यांनीही पाठिंबा दिला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा