बेस्टच्या ताफ्यात ३ महिन्यात दाखल होणार २५ टक्के बसगाड्या


SHARE

कामगार संघटनांनी बेस्ट उपक्रमात भाडेतत्वावर बस घेण्याला केलेला विरोध मागे घेतला. त्यामुळं बेस्ट उपक्रमात भाड्यानं बस घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, तब्बल १२५० बसगाड्या पुढील २ वर्षांत बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यामध्ये ४५० वातानुकूलित आणि विनावातानुकूलित मिनी आणि मिडी बसचा समावेश आहे. मंगळवारी याबाबत कामगार संघटना आणि बेस्ट प्रशासनामध्ये सामंजस्य करार झाल्यामुळं न्यायालयात प्रलंबित खासगी बसगाड्यांविरोधातील दावा मागे घेण्यात येणार आहे. त्यानंतर येत्या ३ महिन्यांत पहिल्या टप्प्यात २५ टक्के बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचं समजतं.

खासगी कंत्राटदारांची निवड

बेस्टच्या ताफ्यात वातानुकूलित बसगाड्या नसून, केवळ बीकेसीमध्ये काही मार्गांवर एमएमआरडीएचे सहकार्य घेत बेस्टची वातानुकूलित बससेवा सुरू आहे. मात्र येत्या काळात बेस्टच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वातानुकूलित बसगाड्यांमधून प्रवास करता येणार आहे. त्यासाठी बेस्ट उपक्रमानं ४५० बसेसच्या खरेदीकरिता २ खासगी कंत्राटदारांची निवड केली आहे. बेस्टच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या सर्व बसेस डिझेल इंजिनच्या असून अँथनी गॅरेजेस आणि श्री कृपा सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपन्यांना त्यासाठी कंत्राट देण्यात आले आहे.

सामंजस्य करार

बेस्ट उपक्रम आणि कर्मचारी युनियनमधील परस्पर सामंजस्य करार मान्य झाल्यानं या बसेस येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामधील २५ टक्के बस पुढील ३ महिन्यांत, तर ५० टक्के बस ४ महिन्यांत आणि उर्वरित २५ टक्के बस पाचव्या महिन्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.हेही वाचा -

मुंबईत पाणीकपात, रहिवाशांचे प्रचंड हालसंबंधित विषय
ताज्या बातम्या