Advertisement

बेस्ट कामगारांचे ठिय्या आंदोलन


बेस्ट कामगारांचे ठिय्या आंदोलन
SHARES

वडाळा - बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन आणि बेस्ट क्रांती कामगार संघाच्या वतीने बेस्ट कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने बेस्ट कामगार सहभागी झाले होते.

'बेस्ट प्रशासन तोट्यात असल्याचे कारण पुढे करत बेस्ट कामगारांची फसवणूक केली जात आहे. त्याचबरोबर बेस्ट प्रशासनाकडून जाणीवपूर्वक बेस्ट कामगारांना प्रत्येक महिन्याचे वेतन महिन्याच्या 10 तारखेला किंवा त्यानंतर दिले जाते. ही प्रथा त्वरित रद्द करा' अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 'दरमहा वेतन 1 ते 7 तारखेपर्यंत प्रदान करा, बेस्ट कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर करार तातडीने करण्याचा निर्णय घ्या, तसेच जोपर्यंत मागणीपत्रावर करार होत नाही तो पर्यंत प्रत्येक महिन्याच्या वेतनामध्ये 7 हजार रुपयांची आगाऊ रक्कम प्रदान केलीच पाहिजे' आदी मागण्यांसाठी बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन आणि बेस्ट कामगार क्रांती संघ यांनी संयुक्तपणे हे ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.

'बेस्ट प्रशासन तोट्यात नाही. जर बेस्ट प्रशासन तोट्यात असेल तर 100 नव्या बस विकत घेऊ शकेल का? फक्त कारण देत आनागोंदी कारभार करायचा आणि कामगारांची दिशाभूल करायची' असा आरोप युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी यावेळी केला. पूर्वी बेस्टची 5 आगार होती. आज 26 आगार आहेत. ही बेस्टची प्रगतीच आहे. तरी बेस्ट तोट्यात कशी काय? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. प्रवासी नसलेल्या ठिकाणी बस चालवण्याचा प्रशासनाचा अट्टाहास असल्याने नुकसान होत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केलाय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा