Advertisement

बेस्ट उपक्रमात ४०० बस भाडेतत्त्वावर; खासगीकरणाविरोधात भाजप आक्रमक

बेस्ट उपक्रमात ४०० बस भाडेतत्त्वावर आणि कंडक्टर कंत्राटी घेण्याच्या निर्णयाविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

बेस्ट उपक्रमात ४०० बस भाडेतत्त्वावर; खासगीकरणाविरोधात भाजप आक्रमक
SHARES

बेस्टच्या खासगीकरणावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. बेस्टच्या खासगीकरणाच्या डावात विरोध पक्षांनीही सहयोग दिल्याची टीका करत भाजपने त्याविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवाय, बेस्ट उपक्रमात ४०० बस भाडेतत्त्वावर आणि कंडक्टर कंत्राटी घेण्याच्या निर्णयाविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्य आणि महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या शिवसेनेने बेस्टच्या अर्थसंकल्पाच्या विलीनीकरणाचा केलेला ठराव कधी अमलात आणला येईल, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. बेस्टमध्ये चालक कंत्राटी स्तरावर घेतले जात असताना आता कंडक्टरही त्याचप्रकारे सेवेत घेतले जाणार आहेत. त्याबाबत मंगळवारच्या बेस्ट समिती बैठकीत दुपारी २ ते रात्री ११पर्यंत अशा ७ तास चाललेल्या प्रदीर्घ बैठकीत भाजपने विरोधाची भूमिका घेतली होती.

मात्र सत्ताधारी शिवसेनेस आणि काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाने समर्थन दिल्याने बहुमताच्या आधारे प्रस्ताव मंजूर झाल्याचा मुद्दा भाजपतर्फे गुरूवारी उपस्थित करण्यात आला. मुंबई पालिकेतील भाजपचे गट नेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य, प्रकाश गंगाधरे, अरविंद कागीनकर यांनी शिवसेनेसह अन्य विरोधी पक्षांना या संदर्भात लक्ष्य केले आहे.

बेस्ट प्रशासनाने प्रत्येकी ३ गटांत प्रत्येकी २०० नुसार एकूण ६०० बस, चालक आणि कंडक्टर भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्या तिन्ही गटांसाठी वेगवेगळे कंत्राटदार येणे अपेक्षित होते. अंतिम टप्प्यात दोन निविदा उरल्या. त्यावेळी एकाच निविदाकारास २०० पेक्षा जास्त बसचे कंत्राट देण्यात येऊ नये, अशी भूमिका भाजपने मांडली होती. हे कंत्राट पहिल्या तीन वर्षांसाठी देऊन त्या कंत्रादाराच्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्या कंत्राटाच्या नूतनीकरणाचा निर्णय घ्यावा, अशी भूमिका घेतली. त्यावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमताच्या जोरावर मंजूर केल्याचे भाजपने मांडले आहे.

बेस्ट तोट्यात असताना जाहिरातदारांना शुल्कामध्ये १०० टक्के सवलत देण्याच्या प्रस्तावालाही भाजपने विरोध केल्याचे स्पष्ट केले. बेस्टमध्ये नवीन कर्मचाऱ्याप्रमाणे अनुकंपा तत्त्वावरील भरतीही बंद आहे. तर इतर विभागात खासगी कंत्राटदार नेमले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. आगारातील स्वच्च्ता, भूमिगत केबल टाकणे, वीज बिल छपाई, बिल वाटप या कामांसाठीही आता खासगी कंत्राटदार नेमले आहेत. त्याबाबतही भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा