Advertisement

मुंबई लोकलमधील 'सीसीटीव्ही'ची योजना अद्याप धीम्या मार्गावर

पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील २५९ लोकलपैकी अवघ्या ८५ लोकलच्याच डब्यांत कॅमेरा बसवण्यात रेल्वेला यश आलं आहे.

मुंबई लोकलमधील 'सीसीटीव्ही'ची योजना अद्याप धीम्या मार्गावर
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन नेहमी वेगवेगळे उपक्रम हाती घेत असतं. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या जातात. अशातच रेल्वे प्रवासात होणाऱ्या चोरी, अपघात व महिलांच्या छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनानं लोकलच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला होता. मागील २ वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला होता. त्यानुसार, पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील २५९ लोकलपैकी अवघ्या ८५ लोकलच्याच डब्यांत कॅमेरा बसवण्यात रेल्वेला यश आलं आहे.

पश्चिम रेल्वे महिलांबरोबरच पुरुषांच्याही डब्यांत कॅमेरे बसवीत आहे. परंतू, मध्य रेल्वेवर महिला डब्यांनाच प्राधान्य दिलं जात असल्याचं समजतं. पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी (आधीचे एल्फिन्स्टन रोड) स्थानकातील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील पादचारी पुलांबरोबरच विविध सुविधांचा आढावा घेतला होता. या वेळी लोकलच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला.

फेब्रुवारी २०१८ मध्ये या प्रकल्पाला केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मध्य व पश्चिम रेल्वेवर कॅमेरा बसवण्याच्या कामाला रेल टेलकडून सुरुवात करण्यात आली. अद्याप मात्र हे काम संथगतीनं सुरू असल्याचं दिसतं. कोरोनाकाळातील मागील ८ महिन्यांत लोकल बंद असताना प्रकल्पाला गती मिळाली नाही.

पश्चिम रेल्वेवर साधारण १०० लोकल गाड्या आहेत. यातील ४७ लोकलच्या १४४ महिला डब्यांत आणि ६० पुरुषांच्या डब्यांत कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मध्य रेल्वेवरही एकूण १५९ लोकल गाड्या आहेत. यातील ३८ लोकलच्या फक्त महिला डब्यांतच कॅमेरा बसवण्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.

२०१९ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेवर एकूण ३३ हजार ८२८ विविध गुन्हे दाखल झाले. जानेवारी २०२० ते नोव्हेंबर २०२० पर्यंत ८ हजार २७ गुन्हे घडले आहेत. चोरी, दरोडे, विनयभंग, मारहाण, खून, खुनाचा प्रयत्न यासह अन्य गुन्ह्यांचा समावेश आहे. यात लोकलमधील प्रवासात अधिकतर चोरी, विनयभंगाचे गुन्हे दाखल असतात. त्यामुळं गुन्हेगाराचा शोध घेत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा चांगलाच उपयोग होऊ शकतो. परंतु कॅमेरे बसवण्याची कामेही संथगतीनं होत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा