Advertisement

धुक्याने अडवली मध्य रेल्वेची वाट


धुक्याने अडवली मध्य रेल्वेची वाट
SHARES

सलग चौथ्या दिवशी मध्य रेल्वे उशीराने धावत आहे. सोमवार, मंगळवारी झालेल्या पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला. तर त्यापाठोपाठ बुधवारी सायंकाळी दिवा स्थानकाजवळ मालगाडीचा डबा घसरल्याने 'लोकलखोळंबा' झाला. त्यातच गुरूवारी सकाळी पुन्हा एकदा धुक्याने मध्य रेल्वेची वाट अडवल्याने लोकल धिम्या गतीने धावत अाहेत. बदलापूर ते दिवा स्थानकांदरम्यान प्रामुख्याने धुक्याची दुलई पसरलेली होती. परिणामी ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला.



धुकं कशामुळे?

दोन दिवस झालेल्या पावसामुळे मुंबईतील तापमानात चांगलीच घट झाली आहे. त्यामुळे बुधवारपासून सर्वत्र धुक्याची चादर पसरत आहे. एका बाजूला मॉर्निंग वॉकला जाणारे या धुक्याचा मस्तपैकी आनंद लुटत असताना दुसरीकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचे मात्र सकाळी हाल झाले.


किती उशीर?

धुक्यामुळे मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील लोकल साधारणत: ३५ ते ४० मिनिटे उशीराने धावत होत्या. सलग चौथ्या दिवशी मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रवासी संतापले आहेत. अंबरनाथ-बदलापूर दरम्यान दाट धुकं असल्यामुळे त्याचा परिणाम लोकलबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसला.


तापमानात आणखी घट होण्याची शक्यता

दोन दिवस मुंबईत झालेल्या पावसामुळे तापमानात चांगलीच घट झाली आहे. रविवार पर्यंत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रविवारी पारा १९ डिग्री सेल्सिअस, तर सोमवारी १८ डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा