Advertisement

मेगाब्लॉकमुळं डोबिवली स्थानकात प्रवाशांचे 'मेगा'हाल

सकाळपासून एकही लोकल नसल्यानं डोबिवली स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे.

मेगाब्लॉकमुळं डोबिवली स्थानकात प्रवाशांचे 'मेगा'हाल
SHARES

ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेनं बुधवारी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकमुळं कल्याण ते डोंबिवली दरम्यानची रेल्वे वाहतूक सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. परंतु, सुट्टीचा दिवस असला तरी सकाळपासून एकही लोकल नसल्यानं डोबिवली स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे.

मेगाब्लॉक सुरू

मध्य रेल्वेनं मेगाब्लॉकच्या ठरलेल्या वेळेआधीच मेगाब्लॉक सुरू केल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. तसंच, हाल होत असल्यानं डोंबिवली स्थानकातील प्रवाशांनी स्टेशन मास्टरच्या केबीनबाहेर मोठी गर्दी केली आहे. तसंच, स्थानकांवर कोणतीही घोषणा करण्यात येत नसल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

पादचारी पूल

ठाकुर्ली रेल्वे स्थानकात पादचारी पूल बांधून तयार आहे. या पुलावर ६ मीटर लांबीचे ४ गर्डर शक्तिशाली क्रेनच्या साहाय्यानं ठेवण्यात येणार आहेत. हे काम सकाळी ९.४५ ते दुपारी १.४५ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. विनाअडथळा हे काम पूर्ण व्हावं यासाठी कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यानची लोकल सेवा सकाळी ९.१५ ते दुपारी १.४५ या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे.

प्रवाशांची गैरसोय

या मेगाब्लॉकमुळं १२४ लोकल, १६ लांब पल्ल्याच्या गाड्या ४ तासांच्या अवधीत रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मेगा ब्लॉकच्या काळात ८७ विशेष लोकल कल्याण ते कर्जत-कसारा आणि सीएसएमटी ते डोंबिवली दरम्यान सोडण्यात येणार आहेत.


विशेष बस

लांब पल्ल्याच्या काही गाड्या दिवा-पनवेल-कर्जत मार्गे वळविण्यात येणार आहेत. नाताळ सुट्टीचा दिवस असल्यानं प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेनं केडीएमटी प्रशासनाला विशेष बस सोडण्याची मागणी केली आहे. ठाणे-सीएसएमटी लोकल सेवा त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली.

रद्द केलेल्या एक्स्प्रेस

  • कोल्हापूर-सीएसएमटी सह्याद्री, भुसावळ पॅसेंजर, पुणे सिंहगड, मनमाड राज्यराणी, डेक्कन क्वीन, पंचवटी, दादर-जालना जनशताब्दी.
  • एलटीटी-हजूर साहिब, नागरकोईल, हैदराबाद एक्स्प्रेस दिवा-पनवेल-कर्जत मार्गे सोडण्यात येणार आहे.
  • कल्याणहून नाशिकडे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाडय़ा दिवा रेल्वे स्थानकादरम्यान थांबविण्यात येणार आहेत.

केडीएमटीची बससेवा

कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमानं कल्याण ते डोंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सकाळी ९.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत विशेष वाढीव २० बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. डोंबिवलीत बाजीप्रभू चौक येथून बसचं संचालन करण्यासाठी विशेष अधिकारी, पर्यवेक्षक वर्ग तैनात करण्यात आला आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक इथंही बस थांबा ठेवण्यात आला आहे.



हेही वाचा -

मुंबई-पुणे मार्गवरील 'या' गाड्या पूर्ववत

लवकरच मिळणार १० रुपयांत थाळी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा