Advertisement

'नो ओव्हरटाईम', मध्य रेल्वेच्या मोटरमन्सचं रविवारपासून आंदोलन


'नो ओव्हरटाईम', मध्य रेल्वेच्या मोटरमन्सचं रविवारपासून आंदोलन
SHARES

रविवारपासून मध्य रेल्वेच्या मोटरमन्सनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रंदिवस सलग सेवा बजावूनही रेल्वेकडून योग्य वागणूक मिळत नसल्याने मोटरमन्सनी १५ ऑक्टोबरपासून जादा काम न करण्याचं ठरवलं आहे.

मोटरमनकडून सिग्नल चुकल्यास त्यांची नोकरीच घालविण्याची धमकी रेल्वे प्रशासनाने दिल्याने मोटरमन्सनी रविवारपासून नियमानुसारच काम करण्याचा इशारा दिला आहे.


अतिताणामुळे चुकतो सिग्नल

उपनगरीय लोकलसेवेत दर ४ मिनिटाला १ लोकल याप्रमाणे १६०० हून अधिक फेऱ्या चालवल्या जातात. मुंबई उपनगरीय सेवेला भौगोलिक मर्यादा असल्याने मोटरमन प्रचंड तणावाखाली काम करतात. त्यामुळे काही वेळेस त्यांच्याकडून सिग्नलही चुकतो.

यासंदर्भात शिक्षा करण्याचे इतर मार्ग असतानाही मोटरमन्सची थेट नोकरीच घालवण्याची धमकी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता डी. सी. सुमन यांनी दिली आहे. त्यामुळे मोटरमनच्या डोक्यावर नोकरीची टांगती तलवार असल्याने मानसिक तणावाने मोटरमनकडून आणखी चुका घडण्याची शक्यता असल्याचं रेल कामगार सेनेच्या मोटरमन युनिटचे प्रवक्ते संजय जोशी यांनी सांगितलं.


२३० जागा रिक्त

मध्य रेल्वेवर ८०० मोटरमन्स असून २३० मोटरमनच्या जागा रिक्त आहेत. तरीही मोटरमन जादा काम करून रेल्वेला सहकार्य करतात. अशावेळी त्यांच्या डोक्यावर नोकरी जाण्याची टांगती तलवार असताना ते काम कसं करणार? असा सवालही केला जात आहे.


वरिष्ठ अधिकाऱ्याचा डाव

आतापर्यंत १३ ते १५ मोटरमन्सना अशा 'स्पॅड' किंवा 'ओव्हरशूट' सारख्या प्रकरणात दोषी ठरवून नोकरीवर गदा आणण्याचा वरिष्ठ विभागीय अभियंता डी. सी. सुमन यांचा डाव असल्याचं मोटरमनचं म्हणणं आहे. त्यामुळे मोटरमननी आंदोलनाचा निर्णय घेतला असून त्यात सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, सेंट्रल रेल्वे मोटरमन असोसिएशन, ऑल इंडिया ओबीसी, ऑल इंडिया एससी, एसटी यांचा पाठिंबा असल्याचं सूत्रांनी सांगितलं.


६०० ते ७०० फेऱ्या रद्द?

येत्या रविवारपासून मोटरमन जादा काम करणार नाहीत. त्यामुळे ६०० ते ७०० फेऱ्याचा दररोज रद्द कराव्या लागणार आहेत. त्यामुळे गर्दी होऊन पुन्हा एल्फिन्स्टन सारखी घटना घडल्यास रेल्वेच जबाबदार असणार असल्याचा इशारा मोटरमन संघटनेने दिला आहे. रेल कामगार सेनेचे अध्यक्ष खा. आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून मोटरमन्सच्या पाठिशी रेल कामगार सेना असल्याचं सरचिटणीस दिवाकर उर्फ बाबी देव यांनी सांगितलं.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा