Advertisement

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेकडून बोटीची खरेदी

पूरस्थिती निर्माण झाल्यास त्यातून प्रवाशांची सुखरूपपणे सुटका करता यावी यासाठी मध्य रेल्वेने बोटी खरेदी करण्यात आल्या आहेत.

SHARES

पावसाळ्यात रुळांवर साचणारं पाणी आणि निर्माण होणाऱ्या पूरस्थितीला तोंड देण्यास मध्य रेल्वे यंदा सज्ज झाली आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास त्यातून प्रवाशांची सुखरूपपणे सुटका करता यावी यासाठी मध्य रेल्वेने बोटी खरेदी करण्यात आल्या आहेत. या बोटी मध्य रेल्वे मार्गावरील विविध ठिकाणी तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बोटी सीएसएमटी, दादर, कुर्ला, ठाणे व बदलापूर इथं सज्ज असतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

२ वर्षांपूर्वी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली होती. बदलापूर रेल्वे स्थानकाजवळच रूळ पाण्याखाली गेल्यानं रेल्वेमार्ग बंद झाले होते. संपूर्ण रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्यानं १ हजार प्रवासी असलेली महालक्ष्मी एक्स्प्रेसही अडकली होती. त्यावेळी रेल्वे सुरक्षा दल, एनडीआरएफ व स्थानिक पालिकांच्या मदतीनं बचावकार्य करण्यात आले. त्यानंतर गेल्या वर्षी पडलेल्या पावसाळ्यात मुंबईतील मशीद रोड, सॅन्डहर्स्ट रोड, भायखळासह अनेक ठिकाणी रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

लोकल व मेल-एक्स्प्रेस जागीच उभ्या राहिल्यानं अनेक प्रवासी त्यात अडकले होते. त्यांचीही सुखरूपपणे सुटका करण्यात आली. त्यावेळी राज्य सरकार, एनडीआरएफच्या मदतीनं प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बोटींचा वापर करण्यात आला होता. अशा घटनांनंतर मध्य रेल्वेनं आता स्वत:च बोटी खरेदी करून त्या पावसाळ्यात विविध ठिकाणी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस, अग्निशमन दलाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी अंबरनाथ, बदलापूर येथे बोटीचा वापर कसा करावा याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. दुपारी ३ ते संध्याकाळी सहापर्यंत हे प्रशिक्षण सुरू होते. मे अखेपर्यंत हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे.

या बोटी सीएसएमटी, दादर, कुर्ला, ठाणे व बदलापूर इथं सज्ज असतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. रेल्वे सुरक्षा दलातील काही कर्मचाऱ्यांना ‘एनडीआरएफ’कडून पूरस्थितीत बचावकार्य कसे करावे, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मशीद रोड, शीव, ठाणे व कल्याण येथे हे कर्मचारी तैनात असतील, असे सुतार यांनी सांगितले.

मध्य रेल्वे सज्ज

  • रेल्वे सुरक्षा दल, महाराष्ट्र सुरक्षा दलांचे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करणार.
  • सीसीटीव्हीद्वारे स्थानकातील प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवणार.
  • लोकल विस्कळीत होऊ नये यासाठी रुळांची उंची वाढवणार.
  • सिग्नल व ओव्हरहेड वायर दुरुस्तीची कामं करणार.
  • नालेसफाई करणार.
  • स्थानकाजवळील झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जात आहे.


हेही वाचा -

रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर राहणार ड्रोनची नजर

राज्यात १८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण तूर्तास स्थगित


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा