Advertisement

पालिका, परिवहन कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा


पालिका, परिवहन कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा
SHARES
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची बंद असलेली लाइफलाइन पुन्हा सुरु झाली आहे. परंतु, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासाठी लोकल सुरु करण्यात आली. मात्र आता मुंबईतील अर्थचक्र सुरू झाल्यानं अनेकांच्या हाताला काम मिळत आहे. तसंच, नोकरदार वर्गही कार्यालयात रुजू होत असून, या नोकरदार वर्गाचा प्रवास सुखकर करण्यासाठी सरकारने परवानगीचा विस्तार केला आहे. त्यामुळं शनिवारपासून मुंबई महानगर प्रदेशमधील सर्व महापालिका कर्मचारी, परिवहन संस्था आणि खासगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना लोकलप्रवास करणे शक्य होणार आहे.

लोकल प्रवासाला बंदी असल्यामुळं अनेकांना ३ ते ४ तास एसटी, बेस्ट बसमधील प्रवास करावा लागत होता. त्यामुळं प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडत होती. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता अखेर कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली होती.

लोकल प्रवासाबाबत राज्य सरकारच्या सुधारित सूचना 

  • ओळखपत्र दाखवून रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येईल.
  • योग्य तिकीट किंवा पास घेऊन प्रवास करता येईल.
  • तूर्तास लोकल फेऱ्या पुरेशा असून परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

एमएमआरमधील सर्व महापालिका, महापालिका शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. बेस्ट-एसटी कर्मचाऱ्यांसह एमएमआरमधील सर्व परिवहन संस्थेतील कर्मचाऱ्यांना देखील लोकलमधून प्रवास करता येईल. खासगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना लोकलप्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

लोकल प्रवास मुभा

  • सर्व रेल्वे, आयआरसीटीसी, एमआरव्हीसी कर्मचारी
  • मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी
  • सर्व महापालिका कर्मचारी (मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, मिरा-भाईंदर, पालघर)
  • पालिका शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी
  • परिवहन सेवेतील कर्मचारी (एसटी, बेस्ट, टीएमटी, केडीएमटी, एमबीएमटी)
  • सरकारी-खासगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांसह पॅथॉलॉजी केंद्रातील कर्मचारी

सद्यस्थितीत अनेक बँकांचे व्यवहार सुरू झाले आहेत. यामुळे बँक कर्मचाऱ्यांना देखील लोकलमधून प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी बँक कर्मचाऱ्यांनी केली होती. मात्र बँकेतील कर्मचाऱ्यांच्या लोकलप्रवासाबाबत राज्य सरकारकडून कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा