कोरोना व्हायरसचा (coronavirus) फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २४ एप्रिल रोजी संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली. या घोषणेनंतर रेल्वे प्रशासनानेही मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वेसेवा ३१ मार्चऐवजी १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या कालावधीत रेल्वे तिकीटाचं आरक्षण केलेल्या प्रवाशांनी धास्तीने आपापलं आरक्षण रद्द करण्यास सुरूवात केली आहे. परंतु आॅनलाइन तिकीट काढलेल्या प्रवाशांनी चुकूनही तिकीट रद्द करू नये, असं आवाहन आयआरसीटीसीने केलं आहे.
१४ एप्रिलपर्यंत रेल्वे बंद
कोरोनाबाधित (COVID-19) असलेल्या एका रुग्णाने जरी रेल्वेने प्रवास केला, तरी त्याच्यामुळे शेकडो, हजारो जणांना कोरोनाची लागण होऊ शकतो. हा धोका ओळखून नेहमीच खचाखच गर्दीने भरून वाहणाऱ्या ट्रेन ३१ मार्चपर्यंत रद्द ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी १४ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन करण्याची घोषणा केल्यावर ही मर्यादा वाढवण्यात आली.
हेही वाचा- Coronavirus Updates : आता १४ एप्रिलपर्यंत देशातील प्रवासी रेल्वेसेवा बंद
या कालावधीत ज्या प्रवाशांनी आपली तिकीटं आरक्षित (train ticket reservation) केली आहेत. त्यांनी तातडीने आपापली तिकीटं रद्द करण्याचा सध्या सपाटा लावला आहे. परंतु यामुळे रेल्वे प्रवाशांचं नुकसान होऊ शकतं याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष वेधलं आहे.
*ADVICE TO THE PASSENGERS ON CANCELLATION OF E-TICKETS* pic.twitter.com/vKR8dZWjLG
— IRCTC (@IRCTCofficial) March 25, 2020
‘असं’ होईल नुकसान
रद्द झालेल्या ट्रेनच्या तिकीटाचे पैसे रेल्वेकडून आपोआप प्रवाशांच्या खात्यात जमा होत असतात. त्यामुळे या प्रवाशांनी तिकीट रद्द करायची गरज नाही. उलट तिकीट रद्द केल्यास नियमानुसार दंडाची आकारणी होऊन कमी पैसे परत मिळतील. याकरीता १४ एप्रिलपर्यंत रद्द झालेल्या गाड्यांसाठी ज्या प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट काढलं असेल त्यांनी ते तिकीट रद्द करु नये, असं आवाहन आयआरसीटीसीने केलं आहे.
तिकीट खिडक्यांवर गर्दी नको
तर ज्या प्रवाशांनी तिकीट खिडकीवरून तिकीट काढलं आहे, अशा प्रवाशांना रद्द झालेल्या ट्रेनचं तिकीट रद्द करण्यासाठी ३ दिवसांऐवजी ३ महिन्यांपर्यंतचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. हे तिकीट रद्द केल्यास प्रवाशांकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. तिकीटाचे पूर्ण पैसे प्रवाशांना परत मिळतील. यासाठी रेल्वे प्रशासनाने आपल्या नियमांत बदल केले आहेत. तिकीट खिडक्यांवरील प्रवाशांची गर्दी टाळणे हा यामागचा हेतू असल्याचं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.