मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळं राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनच्या काळात बेस्ट, एसटी बस वाहतुकीप्रमाणं रेल्वे देखील वाहतूक सेवा पुरवत आहे. या सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सुविधा दिली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वे प्रशासनानं देखील लोकल सेवा सुरू केली. परंतु, ही सेवा केवळ रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच आहे. मात्र, लोकल रुळावर आल्यानंतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक अंतराचे नियम न पाळल्याचं चित्र समोर आलं. यासंदर्भातील काही फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरस झाले होते. त्यामुळं आता मध्य रेल्वे प्रशासनाने वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ९३ टक्यांपर्यत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्कशॉपमध्ये फक्त ७ टक्के म्हणजेच ५०० कर्मचारी कामावर उपस्थित राहणार आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वर्कशाॅप मधील कर्मचारी, देखभाल दुरूस्तीचे कर्मचारी, रेल्वे स्टेशनवर काम करणारे कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यात आले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी मध्य रेल्वेकडून कर्जत ते सीएसएमटी, कसारा ते सीएसएमटी आणि पनवेल ते सीएसएमटी या दरम्यान लोकल फेऱ्या चालविण्यात येत आहे. मात्र कर्मचारी संख्या जास्त असल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना लोकलमध्ये आसन मिळत नाही. त्यामुळे उभे राहून प्रवास करावा लागत असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतुन समोर आली आहे.
रेल्वे कर्मचारी संघटना यांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला. या संदर्भात रेल्वे प्रशासनाची माटुंगा वर्कशॉपमध्ये एक बैठक झाली. त्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिजिकल डिस्टिन्सिंग हा एकमेव उपाय असल्यामुळे कर्मचाऱ्याची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता ७ हजार ५०० ऐवजी फक्त ५०० कर्मचारी कामावर येणार आहेत. लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वे मंत्रालयाने श्रमिक विशेष ट्रेन सोडल्या आहे. यासह आता अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे मंत्रालयाने १ जून पासून नियोजित वेळापत्रकानुसार दररोज १०० ट्रेनच्या २०० फेऱ्या सुरु करण्याची घोषणा रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केली होती.