केंद्र सरकारच्या नागरी उड्डयण मंत्रालयाच्या (civil aviation ministry) निर्देशानुसार महाराष्ट्रात देशांतर्गत (domestic airline) विमानसेवेला सुरूवात झाली. या विमान सेवेच्या माध्यमातून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारने (maharashtra government) आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी केली आहे. या मार्गदर्शक सूचनेनुसार (guideline) राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येईल तसंच या प्रवाशांना १४ दिवस अनिवार्यपणे गृह विलगीकरणात (home isolation) राहणे बंधनकारक असेल.
तसंच प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगचे (social distencing) नियम पाळत त्यांच्या वैयक्तिक वाहनातून विमानतळावरुन (airport) निवासस्थानापर्यंत किंवा निवासस्थानापासून विमानतळापर्यंत प्रवास करता येईल. मात्र, हा प्रवास विमानतळ ते कंटेनमेंट झोन किंवा कंटेन्मेंट झोन ते विमानतळ असा करता येणार नाही, ही बाब या मार्गदर्शिकेत स्पष्ट करण्यात आली आहे.
हेही वाचा - विमान सेवेतून 'इतक्या' प्रवाशांचं मुंबईत आगमन
कडक अंमलबाजवणी
राज्यात या मार्गदर्शिकेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी विमानतळ असलेल्या संबंधित महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किंवा उपायुक्त यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात आले.
प्रवाशांची नावे, त्यांच्या आगमनाचा दिवस आणि वेळ, मोबाईल क्रमांक, पत्ते इत्यादी सविस्तर माहिती संबंधित एअरलाईन्स आणि विमानतळ प्राधिकरणाने संबंधीत नोडल अधिकाऱ्यास उपलब्ध करुन द्यावयाची आहे. आदी विविध सूचना मार्गदर्शिकेद्वारे देण्यात आल्या आहेत.
आजपासून देशांतर्गत विमान सेवा मर्यादित प्रमाणात सुरु. या माध्यमातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका निर्गमित.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 25, 2020
✅ राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येणार. त्यांनी १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक. pic.twitter.com/IHM6Af2JOo
परतीच्या प्रवाशांना सूट
केंद्र शासनाने यासंदर्भात जारी केलेली मार्गदर्शिका हवाई मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असेल. जे प्रवासी राज्यात कमी कालावधीसाठी येणार आहेत (एक आठवड्यापेक्षा कमी) आणि त्यांचं पुढील प्रवासाचं किंवा परतीचं नियोजन आहे, त्यांनी याची संपूर्ण माहिती दिल्यास त्यांना गृह विलगीकरणातून सवलत देण्यात येईल. परंतु, या प्रवाशांना कंटेनमेंट झोनमध्ये परवानगी नसेल. प्रवाशांनी प्रवासादरम्यान काय करावं आणि काय करु नये यासंदर्भातील माहिती सेवा पुरवठा एजन्सींनी प्रवाशांना तिकीटासोबत देणं बंधनकारक आहे.
सेल्फ अॅफिडेव्हीट
सर्व प्रवाशांनी आरोग्यसेतू मोबाईल अॅप डाऊनलोड करणं आवश्यक आहे. प्रवाशांनी या ॲपवरिल संबंधित घोषणापत्र भरावं. कोरोनापासून बचावासाठी घ्यावयाची काळजी आणि करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात विमानात तसंच विमानतळांवर उद्घोषणा करण्यात याव्यात. तसंच प्रवाशांकडून विमानतळावर तसंच विमानत चढ-उतार करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावं. प्रवाशांनी राज्यातील विमानतळावर उतरल्यानंतर स्वयंघोषणापत्र भरुन सादर करायचं आहे. विमानतळावर तपासणीसाठी पुरेसे वैद्यकीय पथक कार्यरत असेल याची काळजी नोडल अधिकारी यांनी घ्यायची आहे.
हेही वाचा - अनेक विमानं रद्द, विमानतळावर प्रवाशांची गर्दी
थर्मल तपासणी
विमानतळाचं नियमितपणे निर्जंतुकीकरण करणं आवश्यक असून साबण, सॅनिटायजर यांची उपलब्धता करण्यात यावी. प्रवास सुरु होण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाची थर्मल तपासणी होईल याची काळजी विमानतळ प्राधिकरणाने घ्यायची आहे. लक्षणे न दिसणाऱ्या प्रवाशांनाच फक्त प्रवासासाठी विमानात प्रवेश देण्यात येईल. सर्व प्रवासी, एअरलाईन कर्मचारी, क्रू आदी सर्वांनी मास्कचा वापर करावा. आगमनानंतर विमानतळावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सर्व प्रवाशांची थर्मल तपासणी करण्यात येईल. यामध्ये ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे दिसतील त्यांना नजिकच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात नेण्यात येईल आणि केंद्र शासनाच्या यासंदर्भातील मार्गदर्शिकेप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.