Advertisement

एसटीने केली ५ लाखांहून अधिक स्थलांतरीत मजुरांची रवानगी

आतापर्यंत आपल्या लाल परीने मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत जाऊन स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी जाण्यास मदत केली आहे.

एसटीने केली ५ लाखांहून अधिक स्थलांतरीत मजुरांची रवानगी
SHARES

महाराष्ट्रातील स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत जाता यावं, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसची सुविधा उपलब्ध करून दिली. २९ मे २०२० पर्यंत ४१ हजार ८७४ बस फेऱ्यांच्या माध्यमातून ५ लाख ८ हजार ८०३ स्थलांतरितांना (MSRTC transports over 5 lakh migrant workers from maharashtra during lockdown) त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा नजीकच्या रेल्वे स्टेशनपर्यंत नेऊन सोडण्यात आलं आहे. स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत बसने पाठविण्यासाठी  शासनाने १०० टक्के निधी उपलब्ध करून दिला असून आतापर्यंत ९४.६६ कोटी रुपये  यावर खर्च झाले आहेत.

अवैध प्रवासावर कारवाई

हे काम एसटी महामंडळ आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांनी हातात हात घालून केलं आहे. एसटी महामंडळाने बस उपलब्ध करून दिल्या तर रस्त्याने पायी जाणाऱ्या लोकांना थांबवून तसंच ट्रक किंवा अन्य माध्यमातून जाणाऱ्या लोकांना थांबवून त्यांच्या प्रवासासाठी  बसची व्यवस्था उपलब्ध करणं, त्यांना नियोजनबद्धरित्या बसमध्ये बसवून देण्याचं काम संबंधित जिल्ह्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आलं आहे. अवैधरित्या लोकांना घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि इतर वाहनांवर आरटीओ कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा - मुंबई लोकल सुरू करण्याशिवाय पर्यायच नाही- उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आभार

अशा आपत्तीच्या प्रसंगी मदतीचे अनेक हात पुढे येत असताना सर्वसामान्य लोकांसाठी  सेवा देणाऱ्या एसटी महामंडळ तसंच आरटीओ कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं असून त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. अडचणीच्या काळात यंत्रणेतील या सर्व कर्मचाऱ्यांची मदत खूप मोलाची आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

या राज्यातील स्थलांतरीत

स्थलांतरितांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस अर्थात आपल्या राज्याची रक्त वाहिनी म्हणून जिचा आदराने उल्लेख होतो त्या एसटी महामंडळाच्या बस पुढे आल्या आणि आता या बसमधून इतर राज्यातील लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा जवळच्या रेल्वे स्टेशनपर्यंत नेऊन सोडण्यात येत आहे.

आतापर्यंत आपल्या लाल परीने मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत जाऊन स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी जाण्यास मदत केली आहे.

यातील काही स्थलांतरित मजुरांनी पुढच्या प्रवासासाठी श्रमिक रेल्वे सेवेचाही लाभ घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसच्या माध्यमातून जसं इतर राज्यातील स्थलांतरित मजूर आणि कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविले जात आहे तसेच इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना राज्यात आणण्याचंही काम केलं जात आहे.

हेही वाचा - कोरोना योद्ध्यांना ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा