Advertisement

मुंबई लोकल सुरू करण्याशिवाय पर्यायच नाही- उद्धव ठाकरे

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याचं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

मुंबई लोकल सुरू करण्याशिवाय पर्यायच नाही- उद्धव ठाकरे
SHARES

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहेत. अशा स्थितीत खासगी वैद्यकीय सेवेची मदत घेताना या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याचं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (need to start mumbai local train for essential service says maharashtra cm uddhav thackeray) यांनी केलं.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी २९ मे रोजी घेतला. यावेळी त्यांच्यासोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता, महापालिका आयुक्त आय.एस. चहल आदी उपस्थित होते.

प्रशासनाला निर्देश

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोविड १९ व्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचारांसाठी विशेषत: येणारा पावसाळा लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपापलं क्लिनिक सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे. या डाॅक्टरांच्या सुरक्षेसाठी त्यांना पीपीई किट देण्याची व्यवस्था करण्यात यावी. वैद्यकीय सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी लागणार्‍या मनुष्यबळासाठी मुंबई रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रशासनाने सातत्याने यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. 

हेही वाचा - आता सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडासाेबत शिक्षाही होणार

येत्या पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता असते. या आजारांची आणि कोविड १९ ची लक्षणे सारखी असल्याने जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. ताप, कोरडा खोकला, अशक्तपणा, अर्धशिशी, नाक चोंदलेलं असणं अशा स्वरुपाची लक्षणे दिसत असल्यास लगेच चाचणी करणं गरजेचं आहे. पण अशी चाचणी डॉक्टरांच्या लेखी सल्ल्याशिवाय करता येत नाही आणि अनेक डॉक्टरांना त्यांच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी खबरदारी घेतल्याशिवाय रोग्यांची तपासणी करणं योग्य वाटत नाही. त्यासाठी त्यांना महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसरमार्फत पीपीई कीट पुरविण्यात यावेत, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले.

केंद्राचा पाठपुरावा करा

महापालिकांची आणि  शासनाची रुग्णालये ही कोविड १९ साठी रुग्णालये म्हणून राखून ठेवण्यात आलेली असल्याने पावसाळ्यातील आजारासंदर्भात खाजगी रुग्णालयांची भूमिका जास्त महत्त्वाची असणार आहे. या रुग्णालयांच्या कर्मचारी वर्गाकरिता सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असणे गरजेचं आहे. म्हणून केंद्राकडे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांकरिता आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सेवांसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी आपण केंद्राकडे केली आहे. त्याचा प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा