Advertisement

वसई-विरार महापालिका म्हणते 'नो कोरोना'

‘नो कोरोना’ या मोहिमेअंतर्गत वसई-विरार महापालिकेनं स्वच्छतेबरोबरच खबरदारीचे उपाय योजण्याकडे लक्ष केंद्रीत केलं आहे.

वसई-विरार महापालिका म्हणते 'नो कोरोना'
SHARES

देशासह राज्यभरात कोरोनाचा विळखा वाढलेला आहे. खबरदारीचे उपाय म्हणून वसई-विरार महापालिकेनं कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी कंबर कसली आहे. महापालिकेनं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला आहे. ‘नो कोरोना’ या मोहिमेअंतर्गत वसई-विरार महापालिकेनं स्वच्छतेबरोबरच खबरदारीचे उपाय योजण्याकडे लक्ष केंद्रीत केलं आहे.

कोरोना व्हायरसची लागण गर्दीच्या ठिकाणी होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये गर्दी सर्वात जास्त असते. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन वसई-विरार महापालिकेनं सकाळी ९ ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ या दरम्यान प्रत्येक फेरीनंतर बसगाड्यांचं निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला आहे. या निर्जंतुकीकरणात बाहेरून बसगाड्यांवर स्प्रेची फवारणी, तसंच आतल्या बाजूला हँडल, आसने आणि इतर भाग स्प्रे मारून स्वच्छ करणं यांचा समावेश आहे.

जास्तीत जास्त गर्दीच्या ठिकाणी केमिकल निर्जंतुकीकरण करण्याचे आमचे प्रयत्न आहे. पालिका आणि बहुजन विकास आघाडीच्या  कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या काळात स्वच्छता दुप्पटीने केली आहे. शिवाय, सोसायटी किंवा खासगी संस्थांना निर्जंतुकीकरणासाठी केमिकल्स उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

हितेंद्र ठाकूर, आमदार आणि अध्यक्ष, बहुजन विकास आघाडी

वसई-विरार महापालिकेच्या ताफ्यात सध्या ११० बसगाड्या आहेत. यागाड्या दिवसभरात ४३ मार्गांवर ९८० फेऱ्या मारतात. वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाची दैनंदिन प्रवासी संख्या एक लाखाच्या वर असून त्यात १३ हजार विद्यार्थी आणि १७ हजार ज्येष्ठ नागरिक प्रवाशांचा समावेश आहे.

वसई-विरार विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना पूरक सुरक्षा प्रदान करणे, ही सद्यस्थितीला प्राधान्यक्रमानं आमची पहिली जबाबदारी आहे. कोरोना व्हायरस आणि त्यापासून बचाव कसा करावा, याविषयीची जागरूकता शक्य त्या सर्व मार्गांनी पसरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सावधानता म्हणून प्राथमिक स्तरावर सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण केलं जात आहे.

- क्षितिज ठाकूर, आमदार, बहुजन विकास आघाडी

या सर्वांची आरोग्य सुरक्षा ध्यानात घेऊन आता नालासोपारा पूर्व-पश्चिम, वसई पूर्व-पश्चिम आणि विरार पूर्व-पश्चिम या सहा ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी निर्जंतुकीकरण केलं जात आहे. प्रत्येक फेरीनंतर प्रवाशांचा खोळंबा होऊ नये म्हणून प्रत्येक बसमागे १० कर्मचारी हे काम करत आहेत. एक बसगाडी निर्जंतूक करण्यासाठी सात मिनिटांचा अवधी लागत असल्यानं प्रवाशांचीही अडचण होत नाही.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा