Advertisement

कोरोनामुळं पुन्हा एसटीच्या प्रवासी संख्येत आणि उत्पन्नात घट


कोरोनामुळं पुन्हा एसटीच्या प्रवासी संख्येत आणि उत्पन्नात घट
SHARES

राज्यातील काही भागात वाढत चाललेली कोरोना रुग्णसंख्या आणि शासनाकडून घालण्यात आलेले निर्बंध त्याचा परिणाम एसटीच्या प्रवाशांसह उत्पन्नावर झाला आहे. १० दिवसांत ७ लाख प्रवासी संख्या कमी झाली असून दर दिवशी ४ कोटी रुपयांनी उत्पन्न घटले आहे.

लॉकडाऊन शिथिलीकरणानंतर प्रथम ५० टक्के आसनक्षमतेने गाड्या चालवण्यात आल्या. ग्रामीण भाग, तालुका भागात सुरू असलेली एसटी हळूहळू राज्यातही धावू लागली. नंतर एसटी वाहतूक पूर्ण प्रवासी क्षमतेने चालवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे एसटीची प्रवासी संख्या वाढू लागली व उत्पन्नही मिळू लागले.

दररोज ३३ लाख प्रवाशांमुळं १६ कोटी रुपये उत्पन्नाची तिजोरीत भर पडत होती. आता पुन्हा एकदा वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणि निर्बधांमुळे एसटीची प्रवासी संख्या आणि उत्पन्नही कमी झाले आहे.

कर्नाटकने राज्यातील सीमेवर करोना चाचणी केंद्र सुरू केले आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी करतानाच संशयित प्रवाशांना सीमेजवळील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहेत. त्याचाही परिणाम एसटी सेवांवर होत असून तेथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही घटली आहे.

मुंबई महानगरासह राज्यातील अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अन्य काही भागांत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. परिणामी राज्य शासनाने विदर्भातील बहुतांश भागात जमावबंदी, संचारबंदीसारखे निर्बंध घातले. कोरोना संसर्गामुळे विदर्भात एसटी ५० टक्के क्षमतेने चालवण्याचा निर्णय झाला. त्यामुळे प्रवासी संख्या कमी झाली. करोनाच्या धास्तीमुळेही काही जणांनी प्रवास करणे टाळण्यास सुरुवात केली आहे.

परिणामी उत्पन्नाचा आलेख घसरला. १५ फेब्रुवारील एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या ३३ लाख होती. त्यावेळी १६ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. २४ फेब्रुवारीला हीच संख्या २६ लाख झाली असून उत्पन्न ११ कोटी ८० लाख झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा