Advertisement

पश्चिम रेल्वेवर आठवी वातानुकूलित लोकल धावणार, चाचणी सुरू

सध्या पश्चिम रेल्वेवर दररोज ७९ वातानुकूलित लोकल फेऱ्या होत आहेत.

पश्चिम रेल्वेवर आठवी वातानुकूलित लोकल धावणार, चाचणी सुरू
SHARES

पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर येत्या मार्चपूर्वी प्रवाशांसाठी आणखी एक वातानुकूलित लोकल दाखल होणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील वातानुकूलित लोकलची संख्या आठवर पोहोचेल. सध्या या लोकलच्या चाचण्या सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पश्चिम रेल्वेवर डिसेंबर २०१७ मध्ये पहिली वातानुकूलित लोकल धावली. सुरुवातीला या लोकलला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र तिकीट दरात कपात होताच प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे.

सध्या पश्चिम रेल्वेवर दररोज ७९ वातानुकूलित लोकल फेऱ्या होत आहेत. सध्या पश्चिम रेल्वेकडे सात वातानुकूलित लोकल असून ‘उपकरणे लोकल डब्याखाली’ असलेली वातानुकूलित लोकल नुकतीच मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली आहे. या लोकलची गेल्या अनेक महिन्यांपासून चाचणी सुरू होती.

आता लवकरच आठवी वातानुकूलित लोकलही पश्चिम रेल्वेवर दाखल होणार आहे. मध्यंतरी सहा डबे वातानुकूलित आणि सहा डबे विनावातानुकूलित अशी एकूण बारा डब्यांची अर्ध वातानुकूलित लोकलचा प्रयोग सुरू होता. त्यासाठी चेन्नईतील रेल्वे कारखान्यात आकाराला आलेली बारा डब्यांची एक वातानुकूलित लोकल मुंबईत दाखल झाली होती. या रेल्वेचे सहा वातानुकूलित डबे काढून त्याऐवजी सहा विनावातानुकूलित डबे जोडण्यात आले आणि या गाडीची चाचणी पश्चिम रेल्वेवर करण्यात आली. हा प्रयोग अयशस्वी झाला आणि संपूर्ण वातानुकूलित लोकल चालवण्यावरच शिक्कामोर्तब झाले.

चाचणी केलेली हीच लोकल पश्चिम रेल्वेवर संपूर्ण वातानुकूलित लोकल म्हणून दाखल होणार आहे. या गाडीला जोडलेले विनावातानुकूलित डबे काढून पुन्हा वातानुकूलित डबे जोडण्यात आले आहेत. या लोकलची रिसर्च डिजाईन स्टॅंडर्ड ऑर्गनायजेशनकडून (आरडीएसओ) चाचणी सुरू असून मार्चपूर्वी ही लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

पश्चिम रेल्वेवर दररोज वातानुकूलित लोकलच्या ७९ फेऱ्या होत असून त्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.



हेही वाचा

विद्याविहार, नाहूर आणि दिवा स्थानकांवर लवकरच दुतर्फा प्लॅटफॉर्म

MMR ला 2023 मध्ये 11 नवीन फूट ओव्हर ब्रीज मिळणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा