Advertisement

पश्चिम रेल्वेच्या 'इतक्या' स्थानकांवर २३ सरकते जिने


पश्चिम रेल्वेच्या 'इतक्या' स्थानकांवर २३ सरकते जिने
SHARES

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी येत्या वर्षभरात पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर सरकते जिने बसविण्यात येणार आहेत.  मुंबईतील १४ स्थानकांवर २३ सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. यापैकी १६ स्थानकांत २० पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. यापैकी सर्वाधिक जिने मुंबई सेन्ट्रल टर्मिनस, वांद्रे स्थानक आणि खार स्थानकात उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. 

मार्च २०२२ पर्यंत ८ पादचारी पुलांचे बांधकाम पूर्ण होणार आहे. अनेकदा प्रवासी जिने टाळण्यासाठी एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडतात. गर्दीच्या वेळी पादचारी पुलावर जाण्याऐवजी रुळ ओलांडण्याचा धोका पत्करताना अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या घटना रोखण्यासाठी, तसेच ज्येष्ठ नागरिक, अपंग, गर्भवती महिला यांच्यासह सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्मवर सरकते जिने बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेची उपनगरीय स्थानके आणि टर्मिनसवर ६७ सरकते जिने आहेत. आता आणखी २३ जिने बसवण्याचे नियोजन प्रशासनाने केला आहे. मरिन लाइन्समध्ये एक, मुंबई सेन्ट्रल टर्मिनसवर तीन, महालक्ष्मी स्थानकात एक, वांद्रे स्थानकात तीन, वांद्रे टर्मिनसवर तीन, सांताक्रुझ स्थानकात एक, जोगेश्वरीत दोन, गोरेगाव, मालाड, कांदिवली व बोरिवली, नायगाव स्थानकात प्रत्येकी एक, बोईसर स्थानकात दोन आणि विरार स्थानकांत दोन जिने बसवण्यात येणार असल्याचे समजतं.

पश्चिम रेल्वेवर सध्या ११४ पादचारी पूल असून येत्या वर्षभरात आणखी २० पादचारी पुलांचे नियोजन आहे. यामध्ये आठ पुलांचे काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. 

डिसेंबरमध्ये वांद्रे आणि विलेपार्ले स्थानकात प्रत्येकी एक, जानेवारीत विलेपार्ले स्थानक, फेब्रुवारीत चर्नी रोड, सांताक्रुझ आणि दहिसर स्थानकात प्रत्येकी एक, मार्चमध्ये ग्रॅन्ट रोड स्थानकात एक, अंधेरीत दोन, भाईंदरमध्ये एक, बोईसरमध्ये एक पादचारी पूल  होणार आहे.

उद्वाहकांचीही भर पडणार

सध्या पश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानकांत २५ उद्वाहक प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. आता आणखी आठ उद्वाहक दादर, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली आणि मीरा रोड स्थानकात बसवण्यात येणार आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा