Advertisement

पश्चिम रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे वाढवणार

रेल्वे स्थानकातील गर्दीत चेहऱ्याची ओळख पटवणारे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे.

पश्चिम रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे वाढवणार
SHARES

रेल्वे स्थानकातील गर्दीत चेहऱ्याची ओळख पटवणारे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. उपनगरीय स्थानकात हे कॅमेरे लावण्यात येत असून आतापर्यंत २०७ पैकी २४२ कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली. सध्या त्याची चाचणी सुरू आहे. यामुळे एखाद्या आरोपीला सहजपणे पकडणे शक्य होणार आहे. तसेच बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासह अन्य कामांसाठीही मदत घेता येणे शक्य होणार आहे. तशी अत्याधुनिक यंत्रणा यात असल्याचे समजतं.

रेल्वे प्लेटफॉर्म, पादचारी पुलांप्रमाणेच लोकलमधून प्रवास करतानाही प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. प्रवासावेळी अनेक प्रवाशांच्या वस्तू चोरांकडून लंपास केल्या जातात, तर काही वेळा चोरीच्या उद्देशाने प्रवाशावर हल्ला होतो. प्रवाशांच्या तक्रोरीनंतर चोरांचा शोध रेल्वे पोलिसांकडून घेतला जातो. परंतु त्यासाठी बरीच यंत्रणा कामाला लागते. हीच स्थिती स्थानकात आल्यानंतर बेपत्ता झालेल्या व्यक्तीबाबतही होते. अनेक जण रेल्वे स्थानकात आल्यानंतर बेपत्ता होतात. यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक अधिक असतात. त्यांचा फोटो पोलिसांना दाखवून व सर्व स्थानकात उद्घोषणा करूनच त्या प्रवाशाचा शोध घेतला जातो.

आता बेपत्ता व्यक्ती किंवा अट्टल गुन्हेगार यांचा तपास चेहरे ओळखणाऱ्या कॅमेऱ्यांद्वारे करणे शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरापर्यंतच्या स्थानकात २७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चेहरे ओळखणारी प्रणाली समाविष्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत २४२ कॅमेऱ्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कॅमेऱ्यांच्या यंत्रणेत प्रणाली समाविष्ट केल्यानंतर विविध उपनगरीय स्थानकात ते बसवण्यात येतील.

संशयित आरोपी, अट्टल गुन्हेगार, हरवलेल्या वक्ती, अनधिकृत तिकीट दलाल यांचे छायाचित्र व अन्य माहिती या यंत्रणेत समाविष्ट करण्यात येईल. संबंधित व्यक्ती कॅमेऱ्याच्या कक्षेत येताच त्याची माहिती तात्काळ रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळेल. त्यामुळे ही व्यक्ती स्थानकात नेमकी कु ठे आहे याची माहिती मिळताच त्याचा मागोवा घेतला जाणार आहे. ही यंत्रणा २४ तास कार्यरत असेल.

या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गर्दी व्यवस्थापनही करता येणार आहे. रेल्वे स्थानकातील  फलाट, पादचारी पुलांवर प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होताच कॅमेरा ते टिपेल व त्वरित अलार्म वाजून रेल्वे नियंत्रण कक्षाला याची माहितीही देईल. शिवाय हे कॅमेरे रेल्वे नियंत्रण कक्षाशीही जोडलेले असतील. त्यामुळे त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस पाठवून गर्दीचे नियोजन केले जाईल. सध्या परदेशात अशी यंत्रणा कार्यरत आहे.

पश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानकात एकूण २ हजार ७२९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम वर्षभरापासून हाती घेतले आहे. यात जुने कॅमेरे बदलून त्याऐवजी नवीन कॅमेरे आणि पूर्णपणे नवीन ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येतील. आतापर्यंत १ हजार ७२८ कॅमेरे बसविण्यात आले असून आणखी एक हजार कॅमेरे सहा महिन्यांत बसविले जातील. यामध्येच चेहरे ओळखणाऱ्या कॅमेऱ्यांचाही समावेश आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा