Advertisement

पादचारी पुलांच्या बांधणीसाठी त्रिसदस्यीय समिती


पादचारी पुलांच्या बांधणीसाठी त्रिसदस्यीय समिती
SHARES

एल्फिन्स्टन-परळ स्थानकासह करी रोड, आंबिवली स्थानकातील पादचारी पुलाचे काम लष्कराकडे सोपवण्यात आल्यानंतर नेमकी ही कामे कशी करण्यात येणार? याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. हे काम नियजनानुसार लवकर व्हावे यासाठी एक त्रिसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला होता.


15 दिवसांत प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात

या तीन पुलाच्या बांधणीतील नियोजन आखण्याच्या अनुषंगातील पहिला टप्पा म्हणून मध्य, पश्चिम रेल्वेप्रमाणेच लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीकडून प्रत्यक्ष कामासंदर्भात आवश्यक, पायाभूत कामांचा आढावा घेतला जाणार असून 15 दिवसांत प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे.


नियोजन योग्यपणे साधण्यावर भर

एल्फिन्स्टन स्थानक, करी रोड, आंबिवली स्थानकात लष्कराच्या मदतीने पूल बांधण्याची घोषणा प्रत्यक्षात आणताना नियोजन योग्यपणे साधण्यावर भर दिला जाणार आहे. मंगळवारच्या घोषणनेनंतर तातडीने बुधवारी लष्कर, मध्य, पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत कामे नेमक्या कशा पद्धतीने हाताळली जातील, याबाबत चर्चा झाली.
त्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुख्य पूल इंजिनीअर (सीबीई) प्रमाणेच लष्कराच्या कर्नल पदाच्या अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



या समितीतर्फे अडचणींचा घेतला जाणार आढावा

मध्य रेल्वेतर्फे अजय गोयल, पश्चिम रेल्वेचे एम.एस. चौहान आणि लष्करातर्फे बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुपचे (पूर्वीचे बॉम्बे सॅपर्स) कर्नल विनायक रामास्वामी यांचा समावेश आहे. इतर पुलांप्रमाणेच परळ स्थानकातील (दादर दिशेकडील) पादचारी पूल पूर्वेला जोडण्याचे काम केले जाताना येणाऱ्या अडचणींचा आढावा समितीतर्फे घेतला जाणार आहे. त्यासाठी पूल बांधण्यातील आव्हाने लक्षात घेत नियोजन साधणे शक्य होणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


सर्वेक्षण सुरू

ही समिती पूल उभारणीसाठी आरेखन, लागणारे साहित्य उतरविण्याची जागा ठरवणे, आवश्यक साधनसामुग्री जमवणे, क्रेन्स आणण्याची जागा, त्यांना प्रत्यक्ष कामासाठी लागणारी जागा नेमणे आदी गोष्टींचा आढावा घेणार आहे. एल्फिन्स्टन पुलासाठी लष्करातर्फे रेल्वे अधिकाऱ्यांच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यात आता मातीची तपासणी आदींची भर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा