Advertisement

फुकट्यांवर दंडात्मक कारवाईसाठी एसटी महामंडळ रोज करतंय बसेसची तपासणी

एसटीनं विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी एसटी महामंडळ सतर्क झालं आहे.

फुकट्यांवर दंडात्मक कारवाईसाठी एसटी महामंडळ रोज करतंय बसेसची तपासणी
SHARES

एसटीनं विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी एसटी महामंडळ सतर्क झालं आहे. आता फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. एसटी महामंडळाच्या पथकाकडून रोज बसेसची तपासणी करण्यात येत आहे. एसटीतून प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांचे धाबे दणाणले आहे.

मुंबई विभागाकडूनही ५ आगारांत विविध ठिकाणी तपासणी सुरू आहे. कोरोनामुळं राज्य परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. आता कोरोना संसर्ग ओसरल्यानं बसेस पूर्ववत झाल्या आहेत. लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातही बहुतांश बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.

सध्या प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे; परंतु आजही काही फुकटे प्रवासी प्रवास करताना दिसून येतात. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर अंकुश बसविण्यासाठी एसटी महामंडळाने लक्ष्य केंद्रित केले आहे. एसटी महामंडळाची पथके विविध ठिकाणी तैनात करण्यात आली असून, कुठेही बसची तपासणी करण्यात येईल. २२ सप्टेंबरपासून बसेसची अशी तपासणी करण्यात येत आहे.

मोटार वाहन कायदा १९८८ नुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. सध्या एसटी महामंडळाच्या पथकांकडून जिल्ह्यातील बसेसची तपासणी करून विनातिकीट प्रवाशांवर दंड करण्याची मोहीम सुरू झालेली आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा १०० रुपये यांपैकी जी रक्कम अधिक असेल, ती दंड म्हणून वसूल करण्यात येत आहे. तपासणी अधिकारी यांना बस तपासणीच्या वेळी प्रवाशांनी प्रवास केलेल्या मार्गाचे तिकीट दाखविणे आवश्यक आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा