गुड न्यूज... मुंबईकरांसाठी नवे ५६ पादचारी पूल


  • गुड न्यूज... मुंबईकरांसाठी नवे ५६ पादचारी पूल
  • गुड न्यूज... मुंबईकरांसाठी नवे ५६ पादचारी पूल
  • गुड न्यूज... मुंबईकरांसाठी नवे ५६ पादचारी पूल
SHARE

भारतीय लष्करानं मुंबईत बांधलेल्या रेल्वे स्थानकांतील तिन्ही पादचारी पुलांचं उद्घाटन मंगळवारी करण्यात आलं. मंगळवारपासून एलफिन्स्टन-परळ, करीरोड आणि आंबिवली या तिन्ही स्थानकांतील पादचारी पूल प्रवाशांसाठी अाजपासून खुले झाले आहेत. या तिन्ही पुलांचं उद्घाटन एलफिन्स्टन रेल्वे स्थानकात मुंबईच्या डब्बेवाल्यांच्या हस्ते करण्यात आलं. तर अन्य दोन पुलांचं लोकार्पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आलं.


मुख्यमंत्र्यांचा रेल्वे प्रवास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सीएसएमटी ते परळ असा रेल्वेचा प्रवास केला. सीएसटीएममधील कार्यक्रम आटपून कमीत कमी वेळात परळ स्टेशन गाठण्यासाठी त्यांनी लोकलने प्रवास केला.


लष्कराच्या 'बॉम्बे सॅपर्स'ने उभारले पूल

लष्कराच्या 'बॉम्बे सॅपर्स' या पूल उभारणी विभागाने बेली पद्धतीचे पादचारी पूल आंबिवली, करी रोड आणि एलफिन्स्टन-परळमध्ये उभारले आहेत. आंबिवली स्थानकातील पादचारी पुलाचं काम वेळेत पूर्ण करण्यात आलं होतं. ३१ जानेवारीपर्यंत या तिन्ही पूलाच्या बांधकामाची मुदत देण्यात आली होती. पण, काही तांत्रिक अडचणींमुळे या पादचारी पुलांचं काम लांबलं. पण, अखेर मंगळवारी या पुलांचं उद्घाटन करण्यात आलं आहे.

एलफिन्स्टन पूलावर झाली होती चेंगराचेंगरी

एलफिन्स्टन पुलावर सप्टेंबर महिन्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत २३ प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांचा प्रश्न समोर आला होता. त्यानंतर भारतीय सैन्यानं युद्धपातळीवर काम करत मुंबईतल्या गर्दीच्या ठिकाणी हे पादचारी पूल उभारले.


रेल्वे प्रकल्पासाठी ५१ हजार कोटींची तरतूद

मुंबईच्या रेल्वे प्रकल्पासाठी ५१ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईच्या प्रवाशांचा प्रवास आणखी कसा सुखकर करता येईल, यावर भर दिली जाणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. भारतीय सेनेचं या वेळी मुख्यमंत्र्यांनी भरभरुन कौतुक केलं.आणखी नवीन ५६ पादचारी पुलांचा प्रस्ताव

ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत रेल्वेचे १७ आणि लष्कराचे ३ असे एकूण २൦ पादचारी पूल पूर्ण करण्यात आले आहेत. तर, २२ पूलांचं काम अजूनही सुरू आहे. त्यांचं काम जून २൦१८ पर्यंत पूर्ण होईल. असे एकूण या वर्षातील ४२ पादचारी पूल भारतीय रेल्वेच्या उपनगरीय कक्षात तयार होतील. आणखी ५६ नवीन पादचारी पूलांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. प्रस्ताव आणि प्रक्रियेसह पुढच्या १२ महिन्यांत आणखी १൦൦ पुलांचा समावेश भारतीय रेल्वेत होणार आहे. शिवाय, प्रवाशांच्या सुविधेसाठी एअरकंडिशन कोचेस तयार करण्यात येत आहेत. सेकंड एअरकंडिशन कोचेस देखील तयार करण्यात येणार असून, याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जागेची अडचण आहे, तिथे भारतीय रेल्वेअंतर्गत एलिव्हेटेड मार्ग बनवण्यात येणार आहेत. तसंच गोरेगावपर्यंत जाणारा हार्बर मार्ग लवकरच सुरू करण्यात येईल.

लष्कराला पादचारी पूलांचं काम देण्यामागचा उद्देश फक्त एकच होता की, लवकरात लवकर मुंबईचा विकास व्हावा आणि कामं व्हावीत. मुंबईकरांना लवकरात लवकर चांगल्या सुविधा मिळाव्यात त्यामुळे त्यांचा प्रवास चांगला व्हावा. शिवाय, लष्कराचं काम कशा पद्धतीने असतं, हेदेखील शिकायला मिळालं.
- पियूष गोयल, रेल्वेमंत्री

संबंधित विषय
ताज्या बातम्या