मुंबईकरांचा गारेगार लोकल प्रवास लांबणार

 Mumbai
मुंबईकरांचा गारेगार लोकल प्रवास लांबणार

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांच्या सेवेत येणार अशी चर्चा असलेल्या एसी लोकलला अजूनही मुहूर्त सापडेनासा झालाय. मार्च महिन्यात प्रस्तावित असलेल्या एसी लोकलला आता पावसाळ्यानंतर मुहूर्त मिळणार आहे. पश्चिम आणि मध्य अशा दोन्ही मार्गांवर ही एसी लोकल धावणार आहे. मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या चाचण्या होणे बाकी असून अद्यापही चाचण्यांना सुरुवात झालेली नाही. त्यानंतर पश्चिम रेल्वेवर चाचण्या होतील. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर चाचण्या होण्यासाठी काही महिने लागतील. त्यानंतर एसी लोकल धावेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

54 कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेली बारा डब्यांची एसी लोकल दहा महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली. दहा महिने झाले तरी ती कारशेडमध्ये पडून आहे. ही लोकल दाखल झाल्यानंतर लोकलमध्ये काही तांत्रिक समस्या असल्याचं सांगण्यात आलं. या समस्या सोडवण्यास काही दिवस गेल्यानंतर एसी लोकलच्या कारशेडमध्येच चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर लोकलच्या चाचण्या कारशेडबाहेरही घेण्यात येणार होत्या. पण, अद्याप कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. मध्य रेल्वेवर एसी लोकल धावण्याचे निश्चित असतानाच पश्चिम रेल्वेने आपल्या मार्गावर लोकल विनाअडचण धावू शकते, असा सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे बोर्डाकडे मंजुरी मागितली आहे. ती मंजुरीही अद्याप मिळालेली नाही.

Loading Comments