कोरोना प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लाॅकडाऊनचा मोठा फटका रिक्षा-टॅक्सी चालकांना बसला आहे. हातावर पोट असलेल्या बहुतांशी रिक्षा-टॅक्सी चालकांचे या लाॅकडाऊनच्या काळात प्रचंड हाल झाले. ना सरकारकडून कुठली ठोस मदत ना कोरोना संकट लवकरच संपण्याची चिन्हे, यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या रिक्षा-टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीवर विचारमंथन करण्यासाठी एकाच व्यापीठावर येण्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने यासाठी पुढाकार घेतला आहे.
पॅकेज नाहीच
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी महाराष्ट्रातील सर्व रिक्षा- टॅक्सी- बस संघटनांचे अध्यक्ष/ सरचिटणीस, यांना एक खुलं पत्र लिहिलं आहे. आपल्या पत्रात संजय नाईक म्हणतात की, कोरोना टाळेबंदीमुळे आपल्या सर्व वाहतूक संघटनांच्या सदस्यांचं- रिक्षा, टॅक्सी, बस चालक मालक यांचं अपरिमित आर्थिक नुकसान झालेलं आहे. दुर्दैवाने, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी गेल्या दोन- अडीच महिन्यात वाहतूक उद्योगाला आर्थिक दिलासा देण्याबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.
हेही वाचा - प्रवाशांच्या सोयीसाठी २ हजार टॅक्सी रस्त्यावर
चर्चा होणं आवश्यक
सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात आपल्या सर्व संघटनांच्या लाखो रिक्षा- टॅक्सी- बस चालक मालकांना दिलासा द्यायचा असेल तर भाडेवाड हाच एक पर्याय आहे. मात्र, ही मागणी आपल्याला एकमुखाने करावी लागेल. त्यासाठी सर्व वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होणं आवश्यक आहे. या विषयावर सर्व बाजूंनी चर्चा करण्यासाठी तसंच भाडेवाढ नेमकी किती व्हावी याबाबत निर्णय घेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं असून सोशल मीडियामुळे ते आता सहज शक्य आहे. मला खात्री आहे की, माझ्या या आवाहनाला आपण सकारात्मक प्रतिसाद द्याल. म्हणूनच माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, अधिक माहितीसाठी आपण माझ्याशी किंवा माझ्या सहकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा, असं आवाहन त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे केलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या या आवाहनाला आता इतर रिक्षा- टॅक्सी- बस संघटनांचे अध्यक्ष/ सरचिटणीस कसा प्रतिसाद देतात, यावर पुढील भाडेवाढीचा निर्णय अवलंबून असेल.
टॅक्सी सेवा सुरू
दरम्यान, लॉकडाऊनमुळं मागील २ महिने बंद असलेली टॅक्सी सेवा सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. मुंबईत विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्यानं रेल्वे स्थानकांपर्यंत जाण्यासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेकरीचा मुंबईतील तब्बल २००० टॅक्सी रस्त्यावर उतरल्याची माहिती मिळत आहे. प्रवाशांकरीता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, मुंबई सेंट्रल, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनल्स, वांद्रे टर्मिनल्स इथं ही टॅक्सी सेवा उपलब्ध आहे.
हेही वाचा - टॅक्सी, रिक्षा वाहतुकीवरील बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र