Advertisement

प्रवाशांच्या जीवाशी खेळ, एक्स्प्रेसच्या शौचालयात खाण्याचे पदार्थ


प्रवाशांच्या जीवाशी खेळ, एक्स्प्रेसच्या शौचालयात खाण्याचे पदार्थ
SHARES

उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी नक्कीच तुम्ही लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस गाड्यांतून प्रवास करत असाल! आणि या लांबच्या प्रवासादरम्यान तहान भूक तर लागणारच. त्यामुळे प्रवासादरम्यान गाडीत पाण्याच्या बाटल्या, कोल्ड्रिंक्स आणि खाद्यपदार्थ विकत घेणे साहजिकच आहे. पण तुम्ही ज्या पाण्याच्या बाटल्या म्हणजेच मिनरल वॉटर, कोल्ड्रिंक आणि खाद्यपदार्थ विकत घेत आहात त्या जर एक्स्प्रेस गाड्यांच्या शौचालयात ठेवण्यात येत असल्याचं तुम्हाला कळल्यास नक्कीच तुम्हाला किळस येईल. पण हे प्रत्यक्षात घडत असल्याची माहिती उघड झाली आहे.


पश्चिम रेल्वे प्रशासनाचा अनागोंदी कारभार

पश्चिम रेल्वे मार्गावर एक्स्प्रेस गाड्यांच्या अपंगांसाठी राखीव असलेल्या शौचालयाचा वापर कँटिन कर्मचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्स आणि पाण्याच्या बॉटल्या ठेवण्यासाठी केला जात असल्याचं उघड झालं आहे. यावरून पश्चिम रेल्वे प्रशासनाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे.


संपूर्ण प्रकार

मिरा रोड परिसरात राहणारे अर्षद हे 26 एप्रिल रोजी मुंबईतील वांद्रे जंक्शन येथून सुटणाऱ्या 12909 मुंबई निजामुद्दीन गरीबरथ एक्स्प्रेसच्या अपंगांच्या राखीव डब्यातून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान अर्षद यांना लघुशंकेसाठी जावं लागलं. त्यांनी अपंगांच्या राखीव डब्यातील शौचालयाचा वापर करण्याचा प्रयत्न केला, मात्र हे शौचालय बंद असल्याचं लक्षात येताच त्यांनी पुढच्या डब्यात जाऊन तिथल्या शौचालयाचा वापर केला. दरम्यान ते आपल्या जागेवर पुन्हा आले असता त्यांच्या जागेवर रेल्वेचा स्टाफ बसल्याचं लक्षात आलं आणि त्याचवेळी अपंगांच्या राखीव डब्यातील शौचालय उघडण्यात आल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

यावेळी त्यांनी शौचालयाची पाहणी केली असता त्या शौचालयात एक्स्प्रेस गाड्यांच्या कँटीनमध्ये लागणारे खाद्यपदार्थ ठेवले असल्याचं त्यांनी पाहिलं. या प्रकाराबद्दल त्यांनी त्या ठिकाणी कर्तव्यावर उपस्थित असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला असता कुणीही काही बोलण्यास तयार नव्हते. प्रवाशांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा सगळा प्रकार अपंग प्रवासी अर्षद यांनी त्यांच्या मोबाईल कॅमेरात कैद करून पश्चिम रेल्वेचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे. दरम्यान या प्रकाराबद्दल योग्य माहिती घेऊन कारवाई केली जाईल, असं पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा