आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी गेल्या महिनाभरापासून संपावर आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमधील वेतनवाढीची मागणी राज्य सरकानं मान्य केली. परंतु, विलनीकरणाची मागणी अद्याप मान्य झालेली नाही. त्यामुळं कर्मचारी अजूनही आपल्या संपावर ठाम आहेत. मात्र, यांच्या संपामुळं एसटी बस कमी प्रमाणात धावत आहेत. त्यामुळं एसटी महामंडळाकडून या संपकरी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २५७ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर काही कर्मचाऱ्यांना ८ दिवसांपूर्वीच नोटीस देण्यात आली आहे. त्याला उत्तर न देणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्याची माहिती समोर येत आहे.
बुधवारी २७ एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याच्यादृष्टीनं कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे नोटीस बजावण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २५७ झाली आहे.
एसटीतील १११ कर्मचाऱ्यांना बुधवारी निलंबित करण्यात आले. त्यामुळे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही एकूण १० हजार ४५१ झाली आहे.
निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रथम १५ दिवसांत म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर ३ वेळा सुनावणीसाठीलाही हजर राहण्याच्या सूचना असतात. त्यालाही प्रतिसाद न दिल्यास बडतर्फीची कारवाई करण्याच्यादृष्टीने कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. त्यानुसार आतापर्यंत रोजंदारीवरील २ हजार ४३ कर्मचाऱ्यांचीही सेवा समाप्ती केली आहे.