Advertisement

एसटी कर्मचारी संप: प्रवाशांचे हाल, खासगी वाहतुकीतून लुटमार

राज्य शासनात एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर आहेत.

एसटी कर्मचारी संप: प्रवाशांचे हाल, खासगी वाहतुकीतून लुटमार
SHARES

राज्य शासनात एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर आहेत. गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. त्यातच रेल्वे गाड्यांना असलेली प्रतीक्षायादी, खासगी प्रवासी वाहतुकदारांकडून होणारी लूट यामुळे प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत.

प्रवाशांचे हाल होत असल्यानं राज्य सरकार, विरोधी पक्ष, एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांच्याही भूमिकेवर प्रवासी संघटनांकडून संताप व्यक्त होऊ लागला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा आहे, परंतु संपाला नाही, असंही स्पष्ट करतानाच प्रवाशांचे होणारे हाल थांबवा, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा राज्यातील विविध प्रवासी संघटनांनी दिला आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागणीला समर्थन आहे, पण संपाला नाही. राज्य सरकार, एसटी महामंडळ, विरोधी पक्ष, कर्मचारी संघटनांनी सामंजस्यानं हा प्रश्न सोडवावा आणि प्रवाशांचे हाल थांबवावे. यात कोणतेही राजकारण होता कामा नये, असं प्रवाशांचं म्हणणं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची वाटचाल गिरणी कामगारांच्या संपाच्या दिशेनेच होऊ लागली आहे. सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, कर्मचारी संघटना या तिघांच्या ताठर भूमिकेमुळे राज्यातील एसटी प्रवाशांचे हाल होत आहेत. संप मागे घ्यावा ही कळकळीची विनंती आहे. कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांचे हाल हे सर्वानाच माहीत असून त्यावर राज्य सरकार व महामंडळ, संघटना, विरोधी पक्ष या सर्वानी त्वरित तोडगा काढावा आणि सर्वसामान्यांसाठी एसटी सुरु करावी अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही प्रवासी संघटनांनी दिला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा