Advertisement

एसटीचा प्रवास होणार 'स्मार्ट'

एसटी महामंडळाने रेल्वे आणि बेस्ट उपक्रमा प्रमाणानेच 'स्मार्ट कार्ड'ची सुविधा एसटी प्रवाशांना उपलब्ध केली असून याद्वारे प्रवाशांना खिशातून पैसे न काढताही 'स्मार्ट प्रवास' करता येईल.

एसटीचा प्रवास होणार 'स्मार्ट'
SHARES

तिकीट काढताना सुटे पैसे नसल्यास प्रवासी आणि एसटी बस कंडक्टरमध्ये होणारा वाद आपल्यापैकी कित्येकांनी प्रवासादरम्यान अनुभवला असेल. पण यापुढं असं चित्र अपवादानंच दिसेल. कारण एसटी महामंडळाने रेल्वे आणि बेस्ट उपक्रमा प्रमाणानेच 'स्मार्ट कार्ड'ची सुविधा एसटी प्रवाशांना उपलब्ध केली असून याद्वारे प्रवाशांना 'स्मार्ट प्रवास' करता येईल. 


परिवहन मंत्र्यांची घोषणा

एसटीच्या प्रवाशांसाठी लवकरच 'कॅशलेस स्मार्टकार्ड' योजना सुरू करण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. विशेष म्हणजे हे स्मार्टकार्ड नोंदणीकृत प्रवाशासोबतच त्याच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रवासाकरीता वापरता येईल, अशी माहिती रावते यांनी दिली.


सुविधा १ मे पासून

या योजनेंतर्गत प्रवाशांनी ५० रुपये भरून स्मार्टकार्ड घेतल्यानंतर सुरुवातीला त्यात किमान ५०० रुपयांची रक्कम भरणं आवश्यक आहे. त्यानंतर हे कार्ड रिचार्ज करण्यासाठी किमान १०० रुपये आणि त्यापेक्षा जास्त रुपयांचं रिचार्ज करायचं असल्यास १०० च्या पटीत रक्कम मोजावी लागेल. ही योजना १ मे पासून सुरू होणार असून प्रत्येक आगारात जाऊन प्रवाशांना हे स्मार्टकार्ड विकत घेता येईल.


'या' बसने करता येईल प्रवास 

या स्मार्टकार्डाद्वारे एसटीचा कोणत्याही (साधी, रातराणी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी आणि अश्वमेध) बसने प्रवास करता येईल. फक्त अट एवढीच की संबंधित बसदरांनुसार तिकीटाची रक्कम या स्मार्टकार्डमध्ये असावी.  


ऑनलाईन रक्कम भरण्याची सोय

या स्मार्टकार्डद्वारे कितीही व्यक्तींचं तिकीट काढता येईल. प्रत्येक व्यक्तीने जितका प्रवास केला तितके पैसे त्या कार्डमधून वजा होत राहतील. हे कार्ड ऑनलाईनद्वारे घरबसल्या देखील रिचार्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर तर होईलच, शिवाय सुट्ट्या पैशावरुन वाहक आणि प्रवासी यांच्यातील अनावश्यक वाद-विवाद देखील टाळता येईल.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा