पगार वेळेवर होत नसल्यानं आर्थिक अडचणीत असलेल्या एका एसटी चालकानं नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना साक्री इथे घडली. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जुलै महिन्याचे वेतन तातडीने देण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी सोमवारी ३० ऑगस्ट रोजी आगाराबाहेर आंदोलन करणार आहेत.
संघर्ष एसटी कामगार युनियन या संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे. संघर्ष एसटी कामगार युनियनच्यावतीने ऑगस्ट महिन्यामध्ये कामगारांना वेतन वेळेत मिळावे म्हणून औद्योगिक न्यायलयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने १४ ऑगस्ट २०२१ रोजी कामगारांच्या बाजूने निवाडा देत वेतन तातडीने दिले जावे असे आदेश काढले. तरीही कोर्टाच्या आदेशाचा अवमान करत एसटी महामंडळाने कामगारांना वेतन वेळेत दिले नाही. त्याच्या परिणामी गरिबी व दारिद्र्याला कंटाळून चालक कमलेश बेडसे यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप संघटनेचे कार्याध्यक्ष जगनारायण कहार यांनी केला आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही महिन्यांपासून वेतन वेळेवर न मिळाल्याने अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असल्याचे संघटनेने म्हटले आहे. सोमवारी, एसटी महामंडळाच्या उदासीनतेच्या विरोधात राज्यभरातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगाराबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे.
ही निदर्शने ड्युटीची वेळ संपल्यानंतर होणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. झेंडे बावटे बाजूला ठेवून एक उपेक्षित कर्मचारी म्हणून आपल्या न्याय हक्का साठी यात सामिल होण्याचे आवाहन संघर्ष एस टी कामगार युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी केले आहे.