Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीसाठी आक्रोश, मुंबईत कुटुंबीयांसह काढणार मोर्चा

शुक्रवारी कर्मचारी संघटनांची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ९ फेब्रुवारीला आक्रोश मोर्चाची हाक देण्यात आली असून या आक्रोश मोर्चात एसटी कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसह रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीसाठी आक्रोश, मुंबईत कुटुंबीयांसह काढणार मोर्चा
SHARES

वेतनवाढीच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या समितीने तोंडाला पाने पुसल्याचं म्हणत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा बंदची हाक देत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शुक्रवारी कर्मचारी संघटनांची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ९ फेब्रुवारीला आक्रोश मोर्चाची हाक देण्यात आली असून या आक्रोश मोर्चात एसटी कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसह रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.


कमी पगारात किती वर्षे काम?

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळलेला आहे. कमी पगारात किती वर्षे काम करायचं? असा सवाल करत कर्मचारी संघटनांनी वेतनवाढीच्या मागणीकडे कानाडोळा करणाऱ्या सरकारला दणका देण्यासाठी एेन दिवाळीत ४ दिवस एसटी सेवा बंद केली होती. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयानं एसटी कर्मचाऱ्यांचा बंद बेकायदेशीर ठरवला. त्यानुसार चौथ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी बंद मागे घेतला. न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याचेही आदेशही यावेळी दिले होते.


तुटपुंजी वेतनवाढ

या समितीने नुकताच आपला अहवाल उच्च न्यायालयात सादर केला असून या अहवालामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत. कारण या समितीने तुटपुंजी वेतनवाढ केल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. हा विषय सध्या न्यायालयात असून त्यावर २९ जानेवारीला सुनावणी होणार असल्यानं कर्मचारी संघटना अद्याप बंदबाबतची ठोस भूमिका जाहीर करणं टाळत आहेत. मात्र बंदच्या आधी वातावरणनिर्मिती करण्याच्या तयारीला संघटनांनी वेग दिला आहे.


अहवालाची होळी

त्याचाच भाग म्हणून २५ जानेवारीला मुंबईसह राज्यभरातील सर्व बस आगारांमध्ये उच्च स्तरीय समितीच्या अहवालाची होळी करण्यात येणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं आहे. तर ९ फेब्रुवारीला मुंबईत एसटी कर्मचारी आक्रोश मोर्चा काढणार असून यात कर्मचाऱ्यांचं कुटुंबियही सहभागी होणार आहे. या मोर्चाला राज्यभरातून ५० हजारांहून अधिक कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसमवेत उपस्थित राहतील, असा दावा शिंदे यांनी केला आहे. या मोर्चानंतरही सरकारने अपेक्षित वेतनवाढ दिली नाही, तर बंद करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा-

एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार?

एसटी महामंडळ अधिकाऱ्यांसाठी खुशखबर!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा