मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बीकेसीतून धावणार

  Mumbai
  मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बीकेसीतून धावणार
  मुंबई  -  

  मुंबई ते अहमदाबाद हे 508 किमीचे अंतर काही तासातच पार करण्यासाठी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प रेल्वेने हाती घेतला असून, या प्रकल्पातील मोठी अडचण अखेर दूर झाली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलाची जागा बुलेट ट्रेनसाठी देण्यास अखेर राज्य सरकारने होकार दिल्याची माहिती रेल्वेने पीटीआयला दिली आहे. तर यासंबंधीची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता बुलेट ट्रेनचे मुंबईतील पहिले स्थानक बीकेसी असणार असून, बीकेसीतूनच थेट अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन धावणार हे आता निश्चित झाले आहे. 

  बीकेसीत एमएमआरडीएच्या मालकीची 67 एकर जागा मोकळी आहे. या जागेतील 10 एकर जागा बुलेट ट्रेनसाठी हवी आहे. बुलेट ट्रेनसाठी हीच जागा योग्य आणि व्यवहार्य असल्याने रेल्वे प्रशासन या जागेवर अडून होते. मात्र त्याचवेळी एमएमआरडीएला या जागेवर इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर बांधायचे असल्याने एमएमआरडीएकडून जागा देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला होता. मात्र तरीही रेल्वे प्रशासन याच जागेसाठी आग्रही होते. तर ही जागा मिळत नसल्याने हा प्रकल्प रखडला होता. शेवटी रेल्वेने एमएमआरडीएसह राज्य सरकारचे मन वळवण्यात यश मिळवले असून, एमएमआरडीए-राज्य सरकारने ही जागा बुलेट ट्रेनसाठी देण्यास होकार दिल्याची माहिती रेल्वेने पीटीआयला दिली आहे. त्यानुसार एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापासून ते महानगर आयुक्त युपीएस मदान यांच्यापर्यंत संपर्क साधला. मात्र याविषयावर बोलायला सर्वांनीच नकार दिल्याने एमएमआरडीएकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

  दरम्यान, एमएमआरडीएला या जागेवर इंटरनॅशनल फायनान्स सेंटर बांधायचे होते आणि त्यामुळेच एमएमआरडीए जागा देण्यास नकार देत होते. पण फायनान्स सेंटरवर तोडगा काढतच जागेचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. त्यानुसार बीकेसी ते ठाणे अशा 21 किमीच्या अतरापर्यंत बुलेट ट्रेन भुयारी असणार आहे. त्यामुळे खाली बुलेट ट्रेन स्थानक आणि वर फायनान्स सेंटर उभारण्यात येणार असल्याचेही समजते आहे. आता बीकेसीतील जागेचा प्रश्न निकाली निघाल्याने शक्य तितक्या लवकर कामाला सुरूवात करण्याच्या दृष्टीने रेल्वेकडून प्रयत्न सुरू करण्यात येणार असून, 2018 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. तर मुंबईकरांचे बुलेट ट्रेनमधून प्रवास करण्याचे स्वप्न 2023 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.

  असा आहे प्रकल्प - 

  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन
  • 508 किमीचे अंतर
  • काही तासांतच पार होणार 508 किमीचे अंतर
  • ताशी 350 किमी वेगाने धावणार बुलेट ट्रेन
  • प्रकल्पासाठी 97,636 कोटी रुपये खर्च
  • 81 टक्के खर्च जायकाकडून कर्जाच्या स्वरूपात उभारणार
  • सध्या प्रकल्पासाठीचा तांत्रिक अभ्यास सुरू
  • 2018 मध्ये कामाला सुरूवात होण्याची शक्यता
  • 2023 मध्ये बुलेट ट्रेन धावणे अपेक्षित
  • 508 किमी अंतराच्या मार्गात एकूण 12 स्थानकांचा समावेश
  • बीकेसी ते ठाणे अशा 21 किमी अंतराचा मार्ग भुयारी असणार
  • पुढे बुलेट ट्रेनचा मार्ग उन्नत असणार
  • बीकेसीतील 10 एकरवर बुलेट ट्रेनचे स्थानक असणार
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.